esakal | भाजपनं घेतला धक्कादायक निर्णय ! विधानपरिषदेत मुंडे, खडसेंना वगळून 'यांना' उमेदवारी
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपनं घेतला धक्कादायक निर्णय ! विधानपरिषदेत मुंडे, खडसेंना वगळून 'यांना' उमेदवारी

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.

भाजपनं घेतला धक्कादायक निर्णय ! विधानपरिषदेत मुंडे, खडसेंना वगळून 'यांना' उमेदवारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबईः महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून काही मोठ्या नेत्यांची तिकिटं कापण्यात आली होती. त्यावेळी काही नेते निवडणुकीत पराभूत झाले. त्यातच या निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यातच शिवसेनेनं आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं लक्ष हे भाजपच्या उमेदवारांकडे लागून राहिलं होतं. मात्र आता भाजपनं एक धक्कादायक निर्णय दिला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना चांगला हादरा बसला आहे. 

विधानसभेला संधी न मिळालेले माजी मंत्री एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत होती. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली होती. पण भाजपनं या सर्वांना नाकारलं आहे. त्याऐवजी गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहित पाटील यांची नावं जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अन्य दोन जागांसाठी डॉ. गोपचडे आणि प्रवीण दटके यांच्या नावांचीही चर्चा सुरु आहे. 

अरे बापरे ! "जून आणि जुलैमध्ये येणार कोरोनाची मोठी लाट"

खडसे, मुंडे आणि बावनकुळेंना पुन्हा धक्का

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनीचं नकारात्मक घंटा वाजवली आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे खडसे यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यातच भाजपच्या या निर्णयाचा सर्वाधिक धक्का हा पंकजा मुंडेंच्या समर्थकांना बसू शकतो. कारण स्वतः मुंडे यांनी निवडणुकीची तयारी करुन अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे भरण्याची तयारी सुरु केली होती. त्यासाठी शासकीय थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी पत्र सरकारी कार्यालयांना पाठवलं होतं. ते पत्रही व्हायरल झालं होतं.

या वर्षातला अत्यंत किळसवाणा प्रकार : कचराकुंडीतील भाज्या विक्रीला...

हे असतील भाजपचे विधानपरिषद निवडणुकीसाठीचे उमेदवार 

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपनं पडळकर यांना निवडले आहे. बारामतीत विधानसभा निवडणूक पक्षाकडून लढलेले पडळकर यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी देखील झाला होता. त्यांच्याऐवजी भागवत कऱ्हाड यांना राज्यसभेवर संधी मिळाली होती. मोहिते पाटील यांचे नाव आधीपासून चर्चेत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.  माढा लोकसभा मतदारसंघात आणि माळशिरास विधानसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळवून देण्यात मोहिते यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. त्याचे श्रेय त्यांना मिळाले. डॉ. गोपचडे हे नांदेडचे आहे. प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर आहेत.

शिवसेनेचे उमेदवारी जाहीर 

या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेनं या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

यंदा परीक्षा होणार का नाही ? आज लागणार परीक्षांचा निकाल... 

या जागांसाठी असणार निवडणूक 

विधानपरिषदेचे 8 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. त्यापैकी एक जागा 24 एप्रिलच्या आधीपासून रिक्त आहे. यात राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होईल. त्यातच उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणं आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सदस्य होण्याची संधी आहे. 

21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगानं तारीख आणि पूर्ण कार्यक्रमही जाहीर केला. मुंबईत ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मतं हवीत. निवडणुकीच्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेत. 

पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे

 • भाजप- 105
 • शिवसेना- 56
 • राष्ट्रवादी काँग्रेस- 54
 • काँग्रेस- 44
 • बहुजन विकास आघाडी- 3
 • समाजवादी पार्टी- 2
 • एम आय एम- 2
 • प्रहार जनशक्ती- 2
 • मनसे- 1
 • माकप- 1
 • शेतकरी कामगार पक्ष- 1
 • स्वाभिमानी पक्ष- 1 
 • राष्ट्रीय समाज पक्ष- 1
 • जनसुराज्य पक्ष- 1
 • क्रांतिकारी शेतकरी पक्ष- 1
 • अपक्ष- 13

निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल  {288/(9+1)= 28.8} म्हणजेच 29 मते.

no tickets for khadase and pankaja munde for MLC electon BJP gave tickets to these candidates