ना लग्न सोहळे ना गृहप्रवेश, पुरोहित अन् डेकोरेटर्सच्या अर्थाजनावर पाणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

मार्च महिन्यापासून सुरू असणारा लॉकडाऊन आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. याच कालावधीत येणारी लग्नसराई, साखरपुडे, गृहप्रवेश या सोहळ्यांवर निर्बंध आल्यामुळे मंडप डेकोरेशन आणि पुरोहितांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

नवी मुंबई : मार्च महिन्यापासून सुरू असणारा लॉकडाऊन आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. याच कालावधीत येणारी लग्नसराई, साखरपुडे, गृहप्रवेश या सोहळ्यांवर निर्बंध आल्यामुळे मंडप डेकोरेशन आणि पुरोहितांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे विधीवत अंत्यसंस्कारही होत नसल्याने पुरोहितांचा हा देखील मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मंडप डेकोरेटरर्स आणि पुरोहितांना सरकारने मदत करण्याची मागणी संबंधित वर्गाकडून होत आहे.

मोठी बातमी : लॉकडाऊन इफेक्ट ! विकासकामं रखडल्याने कोट्यवधींचा निधी वाळ्या जाणार?

एप्रिल-मे महिना म्हटला की, डोळ्यापुढे उभे राहतात, ते आपल्या नातेवाईकांचे लग्न, हळदी समारंभ, वरात, साखरपुडा, तर काहींनी नवी घरे घेतल्यावर याच काळात गृहप्रवेशाचे कार्यक्रम उरकतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने वाढवलेला टाळेबंदीने या सर्व कार्यक्रमांवर पाणी फेरल्याने या समारंभातून आपला उदरनिर्वाह चालवणारा मंडप डेकोरेटर्स व पुरोहित वर्ग संकटात सापडला आहे. 

हे नक्की वाचा पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

मंडप डेकोरेटर्सकडे मांडव बांधणे, विजेचे दिव्यांच्या माळा लटकवणे, साऊंड सिस्टिम सुरू करणे अशा विविध कामांसाठी कामगार वर्ग असतो. या कामगार वर्गाला सध्या डेकोरेटर्सना विनामोबदला वेतन द्यावे लागत आहे. परंतु, लग्न समारंभाच्या ऑर्डरच मिळत नसल्याने या कामगारांना सांभाळायचे कसे? असा प्रश्न डेकोरेटर्ससमोर पडला आहे. लॉकडाऊनचा या सर्व कार्यांवर निर्बंध आल्याने अनेकांनी समारंभ पुढे ढकलली आहेत. ही सर्व घटके असंघटीत असल्यामुळे त्यांना मदत करणारेही कोणी पुढे येत नाहीत. तसेच त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत मिळणाऱ्या बक्कळ उत्पन्नावर गंडांतर आले आहे. त्यात मे महिना संपल्यावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाच्या काळातही कोरोनामुळे भविष्यातील उत्पन्नावरही गदा आली आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील घटकांना सरकारने मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास सरकारने मज्जाव केला आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर उतरकार्य करण्यासही  मनाई करण्यात येत आहे. यामुळे ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्मशानात मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवूनही उत्तरकार्य करता येऊ शकते. सरकारने तशी परवानगी द्यावी.
- संजय व्यवहारे, नेरूळ, नवी मुंबई

संचारबंदीमुळे सर्वच घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत मंडप डेकोरेटर्स होरपळून निघाले आहेत. अशा डेकोरेटर्सना सरकारने मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
- खाजामिया पटेल, रिपब्लिकन सेना, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष

No wedding ceremonies, no homecoming, no earning for priests and decorators


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No wedding ceremonies, no homecoming, no earning for priests and decorators