मुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय चित्रपट उद्योगाने ठराव करीत पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने याबाबतची घोषणा केली. पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केले जाणार नाही, असे असोसिएशनचे अध्यक्ष व चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव येथील फिल्मसिटीमधील चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ यांचा सहभाग असलेल्या जाहिरातीचे चित्रीकरणही होणार होते. मात्र, ते आज रद्द करण्यात आले. दुपारी तेथे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
|