उल्हासनगर पालिकेद्वारे वरणभातातील लेंडी प्रकरणात अस्मिता मंडळाचा पोषणआहार कंत्राट रद्द

दिनेश गोगी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

हा पोषणआहार माणसाच्या खाण्याकरिता योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आज उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी पालिका शाळा नंबर 21 सोबत उल्हास विद्यालय या खाजगी शाळेला पोषणआहार पुरवणाऱ्या अस्मिता महिला मंडळाचा कंत्राट रद्द केला आहे.

उल्हासनगर - या महिन्याच्या 2 तारखेला पालिकेच्या शाळा नंबर 21 मध्ये पुरवल्या जाणाऱ्या पोषणआहार मधील वरणभातात उंदराची लेंडी आढळली होती. हा पोषणआहार माणसाच्या खाण्याकरिता योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आज उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी पालिका शाळा नंबर 21 सोबत उल्हास विद्यालय या खाजगी शाळेला पोषणआहार पुरवणाऱ्या अस्मिता महिला मंडळाचा कंत्राट रद्द केला आहे. एखाद्या मंडळाच्या दोन्ही शाळांचा कंत्राट रद्द करण्यात आल्याची ही उल्हासनगरातील पहिलीच घटना आहे.

काही कालावधी पासून पालिकेच्या शाळेत पुरवला जाणारा पोषणआहार हा नित्कृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी मनवीसेचे शहर उपाध्यक्ष अॅड. कल्पेश माने सातत्याने करत होते.तशातच 2 ऑगस्ट रोजी शाळा नंबर 21 मध्ये पोषणआहार मधील वरणभातात उंदराची लेंडी आढळली होती.त्याची तक्रार मुख्याध्यापिकेने आयुक्त व शिक्षण मंडळाकडे केली होती. मागच्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांच्या पत्नीच्या नावाने अस्मिता महिला मंडळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोषणआहार पुरवला जातो. पण कोणतीही तक्रार नसताना वरणभातात लेंडी सापडली नाही तर टाकण्यात आल्याचा आरोप मालवणकर यांनी केला होता.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार गंभीर असून संबंधित कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत पालिकेने 8 तारखेला अस्मिता मंडळाकडे खुलासा मागितल्यावर 10 तारखेला दिलीप मालवणकर यांनी मंडळाच्या वतीने  शिक्षण विभागा संबंधाने भ्रष्टाचाराच्या केलेल्या तक्रारीमुळे बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट करण्यात आल्याचा खुलासा मंडळाच्या वतीने दिलीप मालवणकर यांनी केला होता. पालिकेने हा खुलासा अमान्य केला.

दरम्यान आज संतोष वाल्मिकी या तरुणाने अद्यापही अस्मिता मंडळाचा कंत्राट रद्द करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ पालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. त्यात आजच पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी नवी मुंबई यांनी अस्मिता मंडळाने  पुरवलेला पोषणआहार हा कायद्याप्रमाणे दिलेल्या प्रमाणाप्रमाणे नसून तो मानवास खाण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाल्याचा अहवाल पाठवल्याने आयुक्त गणेश पाटील यांनी 1 जून 2013 पासून शाळा नंबर 21 व उल्हास विद्यालय या खाजगी शाळेला पोषणआहाराचा पुरवठा करणाऱ्या अस्मिता महिला मंडळाचा कंत्राट रद्द केला आहे.

Web Title: Nomination for Asmita Board canceled by Ulhasnagar municipal corporation in bad meal case