ईशान्य मुंबईत कशी आहे कोरोनाची परिस्थिती, वाचा सविस्तर

ईशान्य मुंबईत कशी आहे कोरोनाची परिस्थिती, वाचा सविस्तर

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढताना दिसतोय. तसंच दररोज कोरोनाबाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. मुंबई शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. सध्या मुंबईतील कोरोना नियंत्रणात येत आहे. अशातच ईशान्य मुंबईत असलेल्या कांजूर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, पवई या भागात कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. या भागातील ६.२६ मृत्यूदर असून आता पालिकेला या भागातील संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं दिसतंय. पालिकेच्या प्रयत्नामुळे या भागात ८३.११ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झालेत. 

घरोघरी केली जाणारी तपासणी, शिबीर, सामाजिक संस्थांचा पुढाकार, विलगीकरणासाठी केलेल्या उपाययोजना यामुळे हा भाग कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कांजूर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, पवई हे परिसर एस विभागाच्या हद्दीत येतात. या भागात मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला.  एप्रिलमध्ये १४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर मे महिन्यात १,४१७, जूनमध्ये २,८९० जण बाधित सापडले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन एस विभागाने तात्काळ उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

सामाजिक संस्थांच्या मदतीने सव्वा सहा लाख लोकसंख्या असलेल्या भागात २०९ तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १५ हजार ८६३ जणांची तपासणी केली गेली. या तपासणीतून २८५ जण कोरोना संशयित आढळले. आवश्यकतेनुसार १६२ जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. 

पालिकेचं वैद्यकीय पथकानं घरोघरी जाऊन तपासणी केली. या पथकांकडून तब्बल ८,६२,२६४ घरांना भेटी देऊन लोकांची तपासणी करण्यात आली. या भागात १,५०७ व्यक्तींच्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ५४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. तसंच ३० हजार ९८३ लोकसंख्या असलेल्या भागात २७ गल्ली शिबिरांचे आयोजन करण्यात आले.  या उपाय योजनांनंतर जुलैमध्ये १, हजार ९५५ जणांना कोरोनाची लागण झाली असं निदर्शनास आलं. तसंच रुग्णांच्या संपर्कातील संशयितांची क्वांरटाईन सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. त्यामुळे हळूहळू या भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळालं.

मार्चपासून आतापर्यंत या भागात ६,७८० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण आज १०.६१ टक्के  आहे. सद्यपरिस्थितीत या भागात ७२० सक्रिय रुग्ण आहेत. सुमारे ५ हजार ६३५ जण कोरोनामुक्त झालेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८३.११ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर ४२५ जणांचा मृत्यू झाला. या भागातील साधारण ६१ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण ५७.८८ टक्के  इतके आहे.

North East Mumbai corona virus patients control bmc sucessful

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com