स्तनांमधील सर्व गाठी म्हणजे कर्करोग नव्हे! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

भाग्यश्री भुवड
Saturday, 31 October 2020

तुमच्या स्तनांमध्ये काही बदल झालेला किंवा वेगळेपणा जाणवला तर लवकरात लवकर डॉक्‍टरांना भेटणे आवश्‍यक आहे.

मुंबई : तुमच्या स्तनांमध्ये काही बदल झालेला किंवा वेगळेपणा जाणवला तर लवकरात लवकर डॉक्‍टरांना भेटणे आवश्‍यक आहे. स्तनांमध्ये होणारा प्रत्येक बदल म्हणजे कर्करोगाचे लक्षण नव्हे. तुम्हाला डॉक्‍टरांनी बायोप्सी करून घेण्याचा सल्ला दिला म्हणजे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेही नाही, असे सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

हेही वाचा - दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

सुमारे दोन ते तीन स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्तनांच्या आजाराला तोंड द्यावे लागते. जगभरात ऑक्‍टोबर महिना स्तन कर्करोग जागरूकता मास म्हणून पाळला जातो. याविषयी मुंबईच्या बीएनडी ऑन्को सेंटरमधील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. बोमन धाबर यांनी सांगितले की, स्तनांमध्ये कर्करोगाखेरीज अन्य काही अवस्थाही आढळतात. यातील दोन प्रमुख प्रकार म्हणजे फायब्रोऍडेनॉसिस किंवा फायब्रोसिस्टिक बदल आणि नॉन-कॅन्सरस किंवा बिनाईन स्वरूपाच्या गाठी होय. स्तनांच्या काही बिनाईन स्वरूपाच्या आजारांवर उपचार झाले नाहीत किंवा वेळत उपचार झाले नाहीत, तर त्यांचे रूपांतर कर्करोगामध्ये होण्याची शक्‍यता असते.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये आईचा पगार झाला बंद, १४ वर्षीय लहानगा चहा विकून चालवतोय स्वतःचं घर

नॉन-कॅन्सरस गाठीवर प्रभावी उपचार झाल्यास आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. अनेक स्त्रियांमध्ये आयुष्यभरात कधी ना कधी तरी स्तनांच्या उतींमध्ये झालेल्या बदलांमुळे फायब्रोऍडेनॉसिस आणि गळवे (सिस्ट्‌स) होतात. त्यामुळे स्तनांचा काही भाग ढेकळासारखा होतो, जाड होतो, मऊ होतो, स्तनाग्रांमधून स्राव येतो किंवा स्तनांमध्ये वेदना होतात. अनेक रुग्णांमध्ये दुग्धनलिकांमध्ये तयार होणाऱ्या बिनाईन गाठींमुळे स्तनाग्रांमधून अपसामान्य पद्धतीचा स्राव वाहतो. गाठींचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होणे खरे तर अगदी सोपे असते; पण तरीही बहुतेक स्त्रिया गाठींकडे दुर्लक्ष करतात. कारण, त्या वेदनारहित असतात, असेही डॉ. धाबर यांनी सांगितले. 

Not all breast lumps are cancer Opinions of medical experts

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not all breast lumps are cancer Opinions of medical experts