घरे रिकामे करण्याच्या नोटिसा; कोरोना संकटात जायचे कुठे? रहिवाशांसमोर पेच...

राहूल क्षीरसागर
Tuesday, 11 August 2020

ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये साधारण 20 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली इमारत स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये धोकादायक घोषित करण्यात आली आहे. एकीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने घरे रिकामे करण्याच्या नोटिसा, दुसरीकडे कोरोनाचे संकट अशा परिस्थितीत जायचे कुठे, असा सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये साधारण 20 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली इमारत स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये धोकादायक घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने इमारतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरे तात्काळ रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. अचानकपणे घरे खाली करण्याच्या नोटिसा प्राप्त झाल्याने रहिवाशांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे घर रिकामे करण्याच्या नोटिसा, दुसरीकडे कोरोनाचे संकट अशा परिस्थितीत जायचे कुठे, असा सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे.

ही बातमी वाचली का? स्टंटबाजी करता, मग मृतदेह झाडावर लटकेल... कुठे घडली अशी घटना...

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील श्रीनगर येथे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची "अल्पबचत विकास' इमारत आहे. या ठिकाणी तळ अधिक चार मजल्याच्या दोन इमारती असून, त्यात सुमारे 20 ते 22 कुटुंबे राहतात. ही इमारत अंदाजे 15 ते 20 वर्षे जुनी आहे. इमारतीत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांबरोबरच कोकण भवन, आरोग्य विभागातील कर्मचारी वास्तव्यास आहेत. या इमारतीत पाण्याची मुख्य समस्या होती. तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील पाणी प्रश्‍न सोडवला होता. तसेच इमारत दुरुस्तीच्या सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. 

ही बातमी वाचली का? सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणः सुशांतची बहिण मीतू सिंग ईडी कार्यालयात

दुरुस्ती कामे केल्यानंतरही इमारतीतील रहिवाशांकडून वारंवार नादुरुस्तीच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. त्याअनुषंगाने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे आणि मुख्यालय शाखा अभियंता अभियंता दत्तू गीते यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी केली असता या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणे आवश्‍यक असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट एप्रिल महिन्यात करण्यात आले होते. याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली. याची गांभीर्याने दाखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने इमारतीत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. ही इमारत तात्काळ रिकामी केल्यानंतर तिचे निर्लेखन करण्यात येणार असून, त्यास महासभेने मंजुरी दिली आहे. 

ही बातमी वाचली का? शाळांच्या भरमसाठ फी आकारणीविरोधात पालक थेट न्यायालयात; वाचा संपुर्ण प्रकरण

कर्मचाऱ्यांमध्ये भीती 
अचानकपणे घरे रिकामी करण्याच्या नोटिसा प्राप्त झाल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट, दुसरीकडे घर रिकामे करण्याची नोटीस, अशा द्विधा परिस्थितीत जायचे कुठे, असा सवाल रहिवासी कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. 
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice of evacuation of houses with corona Thane Zilla Parishad residential building declared dangerous Employees worried