#CAA ला समर्थन करणाऱ्या शाळांना नोटीसा; भाजपची टीका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

  • सीएए समर्थन शाळांच्या अंगलट 
  • शाळांना नोटीस दिल्याने भाजपची टीका 

मुंबई : माटुंगा पूर्व येथील दयानंद बालक विद्यालय आणि दयानंद बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना दक्षिण विभाग शिक्षण उपनिरीक्षकांनी नोटीस बजावली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचा वापर राजकीय विचार पसरवण्यासाठी होता कामा नये, असे आदेश दिले आहेत. यावर माजी शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी सीएएवरून केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांमध्ये सीएएचे समर्थन प्रकरण शाळांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - वाडिया बंदमुळे मनसे आक्रमक पवित्र्यात

देशभरात सीएएविरोधात डाव्या संघटना, कॉंग्रेसकडून आंदोलने सुरू आहेत. यातच माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालय आणि दयानंद बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सीएए समर्थनार्थ पोस्टकार्ड लिहिली. हा प्रकार उजेडात येताच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या शाळांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाने शाळांना नोटीस बजावली आहे. शाळेच्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गैरसमज निर्माण होउन त्यांच्या बालमनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

टॅक्सीच्या टपावर तीन दिवे अनिवार्य : काय आहे या दिव्यांचा अर्थ

परवानगीबाबत खुलासा करण्याचे आदेश 
शाळेच्या या प्रकारामुळे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले आहे. या बैठकीसाठी आपण पोलिस अथवा अन्य यंत्रणेची परवानगी घेतली होती किंवा कसे, याबाबत खुलासा करण्याचे आदेश शिक्षण उपनिरीक्षक दे. म. पोखरणकर यांनी दिले आहेत. शिक्षणमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देताच माजी शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी गायकवाड यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notices to schools that support the CAA;