
उंच ठिकाणी असलेल्या डासांचेे अड्डे शोधण्यासाठी महापालिका ड्रोनची मदत घेणार आहे. महालक्ष्मी येथील धोबीघाटमध्ये आज याबाबत प्रात्यक्षिक पार पडले.
मुंबई: उंच ठिकाणी असलेल्या डासांचेे अड्डे शोधण्यासाठी महापालिका ड्रोनची मदत घेणार आहे. महालक्ष्मी येथील धोबीघाटमध्ये आज याबाबत प्रात्यक्षिक पार पडले.
उंच ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यावर तेथे मलेरीया,डेंगी पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. डासांची अशी अडगळीतील उत्पत्ती स्थाने शोधणे अवघड असते. मात्र पालिका आता उंच ठिकाणीवरील डासांचे अड्डे शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेणार आहे.
हेही वाचा: काय सांगता, मुंबईत यंदा 100 टक्क्यांहून अधिक नाले सफाई...
ड्रोनवरील कॅमराच्या मदतीने हे अड्डे शोधून नंतर ते नष्टही केले जाणार आहेत. धोबीघाट परीसरात आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थित अशी तपासणी करण्यात आली.
बंद असलेल्या गिरण्या, रेल्वेचा परिसर तसेच झोपडपट्ट्यांच्या छतावरील ताडपत्रीत डासांची पैदास होते. अशा ठिकाणी तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या कामगारांना जिवघेणी कसरत करावी लागते. ही कसरत आता थांबण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: घरातच कोरोनावर उपचार घेणाऱ्यांसाठी आता आलेत पॅकेजेस, जाणून घ्या काय काय आहे त्यात..
दहा वर्षांपुर्वी मुंबईत मलेरीयाची साथ आली होती. तेव्हा पालिकेच्या किटक नाशक विभागाचे कामगार आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिड्यांचा वापर करुन गिरण्यांच्या छतावर चढून डासांचे अड्डे शोधले होते.
पालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या हद्दीत वरळी प्रभादेवी परीसरात ड्रोनने डासांचे अड्डे शोधण्यास सुरवात झाली आहे. धोबीघाट येथे झालेल्या प्रात्यक्षिकाच्या वेळी सहाय्यक आयुक्त शरद उघाडे, माजी आमदार सुनिल शिंदे, सचिन अहिर उपस्थित होते.