...आता नवी मुंबई महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

राज्य कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेला पाच दिवसांच्या आठवड्याच्या अंमलबजावणीला अखेर सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक काढल्यानंतर येत्या 29 फेब्रुवारीपासून नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देण्यात येणार आहे.

नवी मुंबई : राज्य कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेला पाच दिवसांच्या आठवड्याच्या अंमलबजावणीला अखेर सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक काढल्यानंतर येत्या 29 फेब्रुवारीपासून नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देण्यात येणार आहे. सरकारच्या निर्णयाच्या या अंमलबजावणीमुळे पालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी सुखावले आहेत. मात्र, या सवलतीमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? पोलिस कर्मचाऱ्यास बलात्काराच्या गुन्ह्याअंतर्गत अटक

पालिकेच्या आस्थापनेवर तब्बल साडेचार हजार कर्मचारी कार्यरत आहेत; तर कंत्राटी व ठोक स्वरूपात साडेसात हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कामाचा वाढता ताण व दबाव पाहता कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेळ मिळत नाही. या कर्मचाऱ्यांच्या राजपत्रित राज्य कर्मचारी युनियनने राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास वाढवून, शनिवार व रविवार अशी दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी देण्याची मागणी केली होती. या मागणीवरून ठाकरे सरकारने पाच दिवसांचा आठवडा घोषित केला होता. मात्र, त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले नव्हते. परंतु सरकारने हे परिपत्रक काढल्यानंतर आता पालिकेच्या प्रशासन विभागातर्फे पाच दिवसांच्या आठवड्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. 

ही बातमी वाचली का? भिवंडीतील एमआयएमची सभा रद्द

या पत्रकानुसार 29 फेब्रुवारीपासून महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी असेल. पालिकेच्या सर्व कार्यालयांची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवारी सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 ही कार्यालयीन वेळ असणार आहे. तसेच सर्व शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.30 अशी असणार आहे. मात्र, नागरीकांची गैरसोय होऊ नये. म्हणून पाणीपुरवठा, शाळा, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य आदी अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... now five days a week in Navi Mumbai Municipal Corporation!