भिवंडीतील एमआयएमची सभा रद्द  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीतील एमआयएमची सभा रद्द 

पोलिसांच्या विनंतीवरून पुढे ढकलल्याची पक्षसचिवांची माहिती 

भिवंडीतील एमआयएमची सभा रद्द 

भिवंडी - देशभरात सध्या नागरिकत्तव कायद्याविरोधात आंदोलने सुरु आहे. दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनाला मागील काही दिवसांत हिंसक वळण लागल्याने त्याच पार्श्‍वभूमीवरच भिवंडी शहरात होणाऱ्या एमआयएमची सभा रद्द करण्याची विनंती पोलिसांकडून एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खालिद गुडू यांना करण्यात आली होती. त्यामुळे एमआयएमकडून ही सभा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तीव्र नाराज झाले आहेत, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे. 

हेही वाचा - ठाकरे सरकार विरोधात ते झालेत आक्रमक

मागील 25 दिवसांपासून नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा गुरुवारी (ता.27) सायंकाळी शहरातील स्वर्गीय परशुराम टावरे मैदानात आयोजित करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही सभा पुढे ढकलावी, अशी विनंती एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खालिद गुडू शेख यांना केल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. नागरीकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी ही सभा घेण्यात येत होती, दरम्यान या सभेची संपूर्ण तयारी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र या सभेला भिवंडीतील भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध करत ही सभा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत पोलिसांनी या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खालिद गुडू शेख यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या निर्णयामुळे दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला होता.

हेही वाचा - मीरा भाईंदर पालिकेवर भाजपचा झेंडा

एमआयएम पक्षाच्यावतीने सभेची तयारी करून मोठे स्टेज व बॅनर सर्व शहरात लावण्यात आले होते. त्यामुळे भिवंडीतील वातावरण चिघळू नये व दोन्ही पक्षातील संघर्ष वाढू नये, यासाठी पोलिसांकडून ही सभा न घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे ही सभा रद्द करण्याची घोषणा पक्षाचे महासचिव वकील अमोल कांबळे यांनी दिली. 

सध्या ही सभा रद्द करण्यात येत असून एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. - ऍड. अमोल कांबळे, महासचिव, एमआयएम  

web title : Bhiwandi MIM meeting canceled

टॅग्स :Bjp