...आता काश्‍मीर खऱ्या अर्थाने स्वर्ग होईल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्‍मीरचा वेगळा दर्जा रद्द केल्यामुळे आता ते राज्य खऱ्या अर्थाने भूलोकीचे नंदनवन होईल, अशी भावना चित्रपट क्षेत्राबरोबरच अनेक स्तरावर सोमवारी व्यक्त झाली.

मुंबई : जम्मू-काश्‍मीरचा वेगळा दर्जा रद्द केल्यामुळे आता ते राज्य खऱ्या अर्थाने भूलोकीचे नंदनवन होईल, अशी भावना चित्रपट क्षेत्राबरोबरच अनेक स्तरावर सोमवारी व्यक्त झाली. चित्रपट निर्माता अशोक पंडित यांच्याबरोबरच अनेकांनी जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. अनेकांनी ट्विट करून केंद्र सरकारचे अभिनंदन केले.

केंद्र सरकारचा आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्यामागील तडफ स्वागतार्ह आहे, असे मूळ जम्मू-काश्‍मीरचे असलेले अशोक पंडित म्हणाले. निर्णय फक्त काश्‍मीरसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठीच ऐतिहासिक आहे. इतके दिवस वेगळेपणामुळे विभाजनवाद वाढून सर्वांचेच नुकसान झाले, देशवासीयांचेच रक्त वाहिले. देशातील केवळ तीन कुटुंबांनी हे राज्य आपली जहागीर मानले होते; मात्र त्यांचा तो राजपाट आता नष्ट झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. याआधीही जम्मू-काश्‍मीर देशाचा भाग होताच, पण आता वेगळेपणा निघून गेल्यामुळे पूर्ण देशच काश्‍मीरच्या बाजूने उभा राहील. त्यामुळे फार मोठे बदल होतील. जम्मू-काश्‍मीर खऱ्या अर्थाने भूलोकीचा स्वर्ग होईल, असा विश्‍वास पंडित यांनी व्यक्त केला.

जनता स्वतंत्र झाली : विद्या ठाकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, आज खऱ्या अर्थाने काश्‍मिरी जनता स्वतंत्र झाली आहे. या निर्णयामुळे राज्याला विकासाची फळे चाखायला मिळतील आणि ते राज्य उर्वरित देशाशी आणखी घट्टपणे एकरूप होईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री विद्या ठाकूर म्हणाल्या.

स्वार्थी राजकारणाचा अंत : विनोद शुक्‍ला
आजच्या निर्णयामुळे जम्मू-काश्‍मीरमध्ये इतकी वर्षे आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याचे चाललेले स्वार्थी राजकारण बंद होईल, असे मत पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती मंचाचे अध्यक्ष व उपाध्याय यांचे पुतणे विनोद शुक्‍ला यांनी व्यक्त केले. निर्णयाबद्दल मी जम्मू-काश्‍मीरच्या जनतेचे अभिनंदन करीन; कारण आता त्यांचा विकास होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही, असेही शुक्‍ला म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Kashmir will be a real paradise... Reactions After revoked article 370 jammu kashmir