वेधशाळेला पावसाचा चकवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

मुंबई वेधशाळेने मंगळवारी (ता. 9) महामुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला होता; मात्र प्रत्यक्षात शिडकावाच झाला.

मुंबई  - मुंबई वेधशाळेने मंगळवारी (ता. 9) महामुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला होता; मात्र प्रत्यक्षात शिडकावाच झाला. महामुंबईतील अनेकांचा आजचा दिवस पाण्यातच गेला. 

वेधशाळेने सोमवार, मंगळवारसाठी हवामानाचा अंदाज पावसाळी ढगांवरून वर्तवला होता. प्रत्यक्षात अतिवृष्टीसाठी कमी दाबाचा पट्टा, वाऱ्याची चक्राकार स्थिती आदी अनेक घटक आवश्‍यक असतात. सोमवार, मंगळवारी अशी कोणतीही स्थिती नव्हती. त्यामुळे वेधशाळेचा अंदाज चुकला असावा, असे मत इंग्लंडमधील रीडिंग विद्यापीठात हवामानशास्त्रात पीएच.डी. करणारे अक्षय देवरस यांनी व्यक्त केले. 

गेल्या बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे मध्ये रेल्वेने नेहमीपेक्षा 30 टक्के कमी लोकल चालवल्या. प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर "ऍलर्ट' जाहीर झाल्यास नौदल, तटरक्षक दल व अन्य सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्या लागतात. या काळात यंत्रणांवर मोठा ताण येतो. अतिवृष्टीचा इशारा असल्यास अनेकदा अत्यावश्‍यक कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या रजा रद्द कराव्या लागतात, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

शेतकऱ्यांचे नुकसान 
हवामानाचे अंदाज वारंवार चुकल्यास भाताचे हेक्‍टरी उत्पादन 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते, असे हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले. हेक्‍टरी 10 क्विंटलपर्यंत उत्पादन कमी झाल्यास शेतकऱ्याला 20 ते 40 हजारांचा फटका बसू शकतो. बियाणे, खतांवरील खर्च वाया गेल्याने नुकसानात आणखी भर पडते असे ते म्हणाले. मागील वर्षी हवामानाचा अंदाज चुकल्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे सांगत एका शेतकऱ्याने हवामान विभागाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. 

चुकलेले अंदाज 
- 26 जुलै 2005 : दुपारी 1 वाजता जोरदार वाऱ्यांसह मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज. त्यानंतर 2.30 पासून 5.30 वाजेपर्यंत अवघ्या तीन तासांत उपनगरात 380 मि.मी. पाऊस. प्रत्यक्षात दुपारी 1 वाजता अतिवृष्टीचा अंदाज जाहीर करणे अपेक्षित होते. 
- 29 ऑगस्ट 2017 : अतिवृष्टीमुळे मुंबई ठप्प; मात्र 30 ऑगस्टला अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज. 
- 3 जुलै 2019 : मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे नेहमीपेक्षा 30 टक्के कमी लोकल चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. परिणामी मोठा गोंधळ. 

अमेरिकेत प्रत्येक ठिकाणासाठी हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त केला जातो. तेथील यंत्रणा अद्ययावत आहे. भारतातील यंत्रणाही चांगल्या दर्जाचीच आहे. अशा वेळी अचूक विश्‍लेषण करण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब करायला हवा. 
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ 

यापूर्वी पावसामुळे रेल्वेमध्ये अडकल्याचा अनुभव होता. त्यामुळे मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा असल्याने विरारपासून दादरपर्यंतचा प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात पाऊस आलाच नाही. त्यामुळे एक दिवस वाया गेला. 
- मनाली राऊत, नागरिक, विरार 

हा नेहमीचाच अनुभव आहे. हवामान खाते इकडून तिकडून माहिती गोळा करते आणि नागरिकांच्या तोंडावर मारते. त्यांच्याकडे तज्ज्ञ नाहीत, अत्याधुनिक यंत्रणाही नाही. जगभरात मिनिटामिनिटांचे अंदाज अचूक येत असताना आपले 12 तासांतील अंदाजही योग्य येऊ नयेत याला काय म्हणावे? 
- राजू शेट्टी, शेतकरी नेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Observatory rain forecast wrong