आता मुंबई पालिकेत ऑनलाईन बदल्या! 

file photo
file photo

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी दबाव टाकण्याचे प्रकार होत असतात. अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून बदली आणि बढतीचे आदेश यापुढे ऑनलाईन जारी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश मिळाल्यानंतर अनेक जण नवीन जागी जाण्यास तयार होत नाहीत. आदेश रद्द करून पुन्हा जुन्याच जागी किंवा इतर इच्छुक ठिकाणी किंवा महत्त्वाच्या विभागात वर्णी लावण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दबावतंत्र वापरले जाते. त्यामुळे अशा दबावतंत्राला आळा घालण्यासाठी बदली आणि बढती ऑनलाईन केली जाणार आहे. ऑनलाईन बदलीचे आदेश थेट सॅपद्वारे संगणकीय प्रणालीत समावेश होतील. त्यामुळे बदली-बढतीसाठी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. 

महापालिकेने सेवानिवृत्तीनंतरच सर्व लाभ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑनलाईनद्वारे देण्याचा निर्णय प्रशासनाने याआधीच घेतला आहे. आता कर्मचाऱ्यांची बदली आणि बढतीचे आदेशही ऑनलाईनच जारी केले जाणार आहेत. त्यामुळे यापुढे ऑनलाईन बदली-बढतीचे आदेश काढण्यात आल्यामुळे संगणकीय पद्धतीने ज्या विभागात बदली झाली आहे, त्याच्या हजेरी पटावर त्यांची नावे समाविष्ट होणार असून त्याचठिकाणी त्यांची बदलीच्या दिवसापासून हजेरी नोंद केली जाणार आहे. बदलीनंतर जो कर्मचारी गैरहजर राहील त्याला आपल्या गैरहजेरीबाबतचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

व्यवहारात पारदर्शकता येणार
पालिकेच्या निर्णयामुळे बदली-बढतीसाठीच्या हस्तक्षेपाला चाप लागणार आहे. बदलीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिली जात असल्याची चर्चा पालिकेत आहे. मात्र, असे व्यवहार बिनबोभाट केले जात होते. आता ऑनलाईन पद्धतीमुळे सर्व व्यवहार बंद होणार आहेत. बदली-बढतीत पारदर्शकता येणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com