महानगरपालिकेतील कार्यालये माजी महापौरांच्या सांगण्यावरूनच सील - भाजप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai-municipal-corporation

मुंबई महानगरपालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने आज मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली.

Mumbai News : महानगरपालिकेतील कार्यालये माजी महापौरांच्या सांगण्यावरूनच सील - भाजप

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने आज मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. भाजपच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांकडे कार्लालय खुली करण्याची मागणी केली. या मागणीवर आयुक्तांनी आपण हा मुद्दा गांभीर्याने घेत असून यावर लवकरच विचार करू असेही आश्वासन दिले. तर इतर राजकीय पक्षांनीही या कार्यालय सीलबंद करण्याच्या कारवाईवर प्रतिक्रिया मांडली आहे. भाजपने या प्रकरणात माजी महापौरांच्या सांगण्यावरूनच आय़ुक्तांनी कार्यालये सील केल्याचा आरोप केला आहे.

भाजपच्या शिष्टमंडळामध्ये महानगरपालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाठ आणि विनोद मिश्रा आदींनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. मुंबई महानगरपालिकेत माजी नगरसेवक हे जनतेचे प्रश्न घेऊन येतात. तसेच पालिकेच्या सुविधा आणि कारभाराची माहिती मिळवण्यासाठी हे लोकप्रतिनिधी येत असतात. मुंबईकरांना आपले प्रश्न मांडण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयातून नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येतात. त्यामुळेच कार्यालये खुली करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

लोकशाहीत अतिशय चुकीच्या पद्धतीने ही कार्यालये सील करण्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे एकीकडे निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि दुसरीकडे कार्यालये बंद करायची हे प्रकार लोकशाहीत योग्य नाहीत. त्यामुळेच कार्यालये खुली करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली. कॉंग्रेसच्या पालिकेतील प्रतिनिधींना संपर्क केला असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

माजी महापौरांचा आयुक्तांचा मॅसेज

शिवसेनेच्या कार्यालयाच्या ठिकाणी गेल्या आठवड्यात झालेल्या राड्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रात्री मुंबई महानगरपालिका आयुक्तांना मॅसेज करून सर्व कार्यालये सील करण्याची मागणी केली. रात्री ११ वाजता हा मॅसेज केल्याची माहिती भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. आयुक्तांनी महापौरांच्या मॅसेजनंतरच कार्यालये सील केल्याचे ते म्हणाले. कार्यालये सील झाल्यानंतर आयुक्तांना धन्यवाद असा मॅसेज पाठवल्याची माहिती मिळाल्याचेही शिंदे म्हणाले.