पत्री पूल येथे अपघातात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकने एका रिक्षाला आणि दोन दुचाकींना धडक दिली

कल्याण ः पत्री पूल येथे अपघातात एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकने एका रिक्षाला व दोन दुचाकींना धडक दिली. लोकसभा निवडणुकीआधी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अद्यापही काम पूर्ण न झाल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

अधिक माहिती अशी, की येथून सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कल्याणकडे येणाऱ्या मार्गावर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकने एका रिक्षाला आणि दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अरुण महाजन यांचा मृत्यू झाला; तर दुसरा दुचाकीस्वार विलास रेडकर हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिस ठाण्याक ट्रक चालकाचा जबाब नोंदविण्याचे काम रात्री उशीरा पर्यंत सुरू होते. 

येथील जुना पूल पाडल्यानंतर एकाच पुलावरून येथील वाहतूक सुरू होती. परिणामी प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पावसाने शहरातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. परंतु, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे एक वर्ष होत असतानाही पुलाच्या कामाची सुरुवातही झालेली नाही. पुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. पालिका प्रशासनाकडून यावर कोणीही भाष्य करण्यास तयार नाही. दरम्यान, कॉंग्रेसच्या शकील शेख यांनी पुलाचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies in accident at Patri Pool