प्रत्येक तीन दिवसांत एका हृदयाची गरज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

आपल्याकडे हृदय प्रत्यारोपणाबाबत जनजागृती वाढवण्याची गरज आहे. मागणीनुसार हृदयाचा पुरवठा होत असल्याचे समजल्यास हृदयरोगी स्वतःहून प्रत्यारोपणासाठी समोर येतील. दोन दिवसांतून एकदा हृदय प्रत्यारोपण झाले, तरच मुंबईकरांचे हृदय वाचवता येईल. 

- डॉ नंदकिशोर कपाडिया, हृदय प्रत्यारोपण सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय 

मुंबई : मुंबईत हृदयविकार झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. सध्या मुंबईतील तीन हजार रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहे. पाच वर्षांपूर्वी हेच प्रमाण दीड हजारांच्या आसपास होते. दर तीन दिवसांत हृदय प्रत्यारोपणासाठी एका रुग्णाची भर पडत आहे. समाजात अवयवदानाबाबत जागरुकता नसल्याने प्रतीक्षायादी दिवसेंदिवस वाढतच आहे. 

झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी)च्या गेल्या दोन वर्षांतील नोंदींनुसार दर तीन दिवसाला एका मुंबईकराचे नाव हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षायादीत नोंदवले जात आहे. या रुग्णांना हृदय मिळण्यासाठी दोन दिवसांतून एकदा एका हृदयाची गरज आहे; मात्र हृदय प्रत्यारोपणाची भीती, शस्त्रक्रियेला लागणाऱ्या खर्चामुळे अनेक रुग्ण प्रत्यारोपणास तयार होत नाहीत, अशी माहिती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचे हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. नंदकिशोर कपाडिया दिली.

दुर्दैवाने आपल्याकडे हृदय व इतर अवयवांच्या प्रत्यारोपणाची एकत्रित संख्या अद्यापही शंभरीच्या पुढे नाही. हृदय प्रत्यारोपणाबाबत आजही अनेकांमध्ये संभ्रम आहे. ज्या वेगाने आपण पाश्‍चिमात्य जीवनशैलीच्या आहारी जात आहोत, त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचे डॉ. कपाडियांनी सांगितले. 

Web Title: One heart requirement every three days