esakal | 15 मे पर्यंत मुंबईची परिस्थिती नियंत्रणात?

बोलून बातमी शोधा

Mumbai Corona Updates

15 मे पर्यंत मुंबईची परिस्थिती नियंत्रणात?

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आणि म्हणता म्हणता मुंबईची रुग्णसंख्या 10 हजार पार पोहोचली. या भयंकर लाटेत लहानगे आणि तरुणांनाही मोठया प्रमाणात कोविडची बाधा झाली. मुंबईसह राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पंधरावड्यापर्यंत ओसरायला लागेल. मात्र मृत्यूदर कमी होण्यास किमान एक महिना लागेल असे महत्त्वपूर्ण भाकीत राज्य टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवले आहे.

दरम्यान जर मुंबईत काही महिन्यांनी येणारी तिसरी लाट थोपवायची असेल तर लसीकरणाचा वेग जास्तीत जास्त वाढण्याची गरज असल्याचे मत राज्य टास्क फोर्स सदस्य डॉ.अविनाश सुपे यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत अजूनही 4 ते 5 हजारांच्या घरात रुग्ण संख्या आहे. राज्यातील प्रमाण वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास किमान 15 ते 20 जातील. पण, वाढलेले मृत्यू कमी होण्यासाठी किमान पुढचा महिना जाईल असेही डॉ. सुपे यांनी साांगितले. सध्या 1.2 टक्के एवढा मृत्यूदर आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर साधारणपणे 10 दिवसांनी मृत्यूदर कमी होतो.

हेही वाचा: फक्त 76 हजार डोस दाखल, केंद्रांबाहेर नागरिकांचा गोंधळ

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र या लाटेनं उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असाही अंदाज आहे.

कोरोनाची लाट ही साधारणत: दोन महिने चालते. त्याच सोबत कडक निर्बंध आणि सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमूळे कोरोनाची दुसरी लाट ओसरला लागली आहे. दुसऱ्या लाटेनंतरही कोरोनाची चिंता राहणार असून तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. अजूनही प्रत्येकाचे लसीकरण झालेले नाही. शिवाय मुंबईत स्थलांतरित लोक येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या लाटेचा जोर कमी करण्यासाठी आणि ती मंदावण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूदर वाढताच

राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे. पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण व्हावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे. मोकळ्या जागा, मैदाने, सोसायट्याचे आवार, हॉल आशा ठिकाणी लसीकरण केंद्र उभारून, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल डॉ. सुपे यांनी सांगितले.

 कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

one month reduce mortality in mumbai state task force