esakal | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूदर वाढताच

बोलून बातमी शोधा

Corona Virus
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूदर वाढताच
sakal_logo
By
मिलिंद तांबेः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यू वाढले आहेत. गेल्या महिन्याभरात मृत्यूदर देखील वाढला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील मृत्यूदर 0.2 % होता. महिन्याभरात त्यात वाढ होऊन तो शेवटच्या आठवड्यात 0.87 पर्यंत वाढला. पुढील आठ ते दहा दिवसात त्यात आणखी वाढ होऊन तो 1 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे राज्य मृत्यू परीक्षण समितीचे म्हणणे आहे.

मृत्यूबाबत केलेल्या अभ्यासानुसार 18 ते 24 एप्रिल दरम्यान मृत्यूदर 0.87 होता. 11 ते 17 एप्रिल दरम्यान 0.56 % तर 4 ते 10 एप्रिल दरम्यान 0.35% मृत्यूदर नोंदवला गेला. पुढील दहा ते बारा दिवस मृत्यूदरात आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर मात्र मृत्यूदर कमी होत जाईल असे राज्य मृत्यू परीक्षण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.

हेही वाचा: मास्क घाला! रेल्वेकडून विनामास्क प्रवाशांवर कडक कारवाई

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 48 तासात दगावणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. एप्रिल 2020 मध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 48 तासात दगावणाऱ्यांचे प्रमाण 40 % इतके होते. जानेवारीत ते कमी होऊन 15 टक्क्यांवर खाली आले. मात्र एप्रिलमध्ये त्यात पुन्हा वाढ होऊन ते 20 टक्क्यांवर आले आहे.

गेल्या महिन्यापर्यंत मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 65 ते 70 हजारांवर गेला होता. सर्व रुग्णालये खचाखच भरली होती. रुग्णांना आयसीयू, व्हेंटिलेटर मिळत नव्हते. शिवाय अनेक रुग्ण रुग्णालयात उशिरा दाखल होत होते. बरेच रुग्ण नर्सिंग होम तसेच छोट्या केंद्रांमध्ये दाखल होत होते. मात्र तेथे सुविधा नसल्याने अनेक रुग्ण गंभीर होत होते. त्यामुळे देखील मृतांचा आकडा वाढल्याचे डॉ सुपे सांगतात.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी पालिकेकडून फक्त दोन दिवसात हजार बेड्सची व्यवस्था

पालिकेच्या कोविड डॅश बोर्डवरील माहितीनुसार, मुंबईत 21 व्हेंटिलेटर बेड्स रिक्त आहेत. तर 67 आयसीयू बेड्स आणि 1254 ऑक्सिजन बेड्स रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक गंभीर रुग्ण वेटिंगवर असून त्यांना 2 ते 3 दिवस बेड्ससाठी वाट पाहावी लागत आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai covid death rate rises