एका शाॅर्ट-सर्किटमुळे झाले 15 कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

अग्निशमन दलाचे बंब येण्यास लागले दोन तास

वाडा : तालुक्‍यातील बिलोशी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या 'हिदुस्थान पेट्रो फोम' या कंपनीला सोमवारी (ता.17) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी 15 कोटीं रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - डोंबिवलीत भीषण आग

हिदुस्थान पेट्रो फोम ही कंपनीत फोमचे उत्पादन घेतले जाते. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास या कंपनीच्या एका शेडला अचानक आग लागली. त्यानंतर फोम हा ज्वलनशिल पदार्थ असल्याने बघता बघता संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी आली. दोन तासानंतर वसई व बोईसर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. त्यानंतर चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली, मात्र तोवर संपूर्ण कंपनी जळून बेचिराख झाली होती. 

महत्त्वाची बातमी - भीमा कोरगाव प्रकरणात पोलिस दलाचा गैरवापर झाल्याचा आरोप

या आगीत कंपनीचे चार शेड, मशिनरी, कच्चा माल, दोन दुचाकी, कार्यालय असे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टशकिटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत कंपनीची 15 कोटी रूपयांची हानी झाली असल्याची माहिती कंपनीचे मालक मदन बन्सल यांनी दिली. 

मुंबई

दोन तासानंतर पोहचले अग्निशमन दल 

वाडा तालुक्‍यात सन 1992-93 च्या सुमारास शासनाने 'डी प्लस झोन' ही योजना जारी केली. ही योजना जारी केल्यानंतर येथे शेकडो कारखानदारांनी आपले बस्तान बसवले. मात्र शासनाने उद्योजकांना सोई सुविधा पुरवल्या नाहीत. यामध्ये अग्निशमन दल ही समस्या महत्वाची असून गेल्या 20-22 वर्षात अग्निशमन दल येथे अस्तित्वात न आल्याने कारखान्याला आग लागलीच तर ती संपूर्ण जळून खाक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदुस्थान पेट्रो फोम कंपनीबाबत देखील हेच झाले असून वाडा येथे अग्निशमन दल नसल्याने वसई व बोईसर येथील अग्निशमन दलाचे बंब येण्यास दोन तास उलटले. ज्यामुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. याआधी देखील अनेक कारखाने असेच जळून खाक झाले असून कारखानदारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाड्यात अग्निशमन दलाची नितांत गरज असल्याची मागणी उद्योजकांसह नागरिक करत आहेत.

web title : One short-circuit caused a loss of Rs 15 crore

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One short-circuit caused a loss of Rs 15 crore