नेरूळ- खारकोपर रेल्वेची वर्षपूर्ती

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पनवेल : नेरूळ ते उरण रेल्वे प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा शुभारंभ खारकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झाला होता. या रेल्वे सेवेला सोमवारी (ता. ११) एक वर्ष पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात नेरूळ-बेलापूर-बामणडोंगरी-खारकोपर असे स्थानके आहेत. या एका वर्षात रेल्वे सेवेचा फायदा उलव्यासह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे; मात्र लाखोंच्या संख्येने या मार्गावरून प्रवासी प्रवास करत असताना सुरक्षितता व सुविधांच्या बाबतीत उदासीनताच पाहावयास मिळत आहे.

खारकोपर व बामणडोंगरी या दोन्ही स्थानकांवरून सकाळी ६.५० ची पहिली लोकल असल्याने अनेक वेळा चाकरमान्यांना सकाळी कामावर जायला तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी बस, रिक्षा, टॅक्‍सी किंवा इत्यादी खसगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे सकाळी पहाटे ५; तर रात्री उशिरा १२ पर्यंत लोकल असावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. अशातच रेल्वेच्या वेळेमध्ये ४५ मिनिटे ते १ तास एवढी तफावत असल्याने प्रवाशांचा प्रचंड वेळ वाया जातो. त्यामुळे लवकरात लवकर लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, पास मिळावेत, यासाठी प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे मागणी करीत असतात. अलिकडेच घाईत लोकल पकडण्याच्या नादात एका तरुणाला जीवदेखील गमवावा लागला आहे.

दरम्यानच्या काळात उलवे व नजीकच्या परिसरातील नागरिकांनी इमेलवर कॅम्पेन सुरू केले होते. याबाबत उलवे येथील रहिवासी इब्राहिम नाखवा यांनी सेंट्रल रेल्वे हार्बर लाईन सीएसएमटीच्या विभागीय व्यवस्थापक यांना पत्राद्वारे रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याबाबत मागणीदेखील केली होती. त्याचबरोबर नेरूळ बेलापूरसह खारकोपरवरून सीएसएमटी, गोरेगाव, ठाणे अशी थेट ट्रेन असण्याची मागणीदेखील केली होती.

आरपीएफ सेवाच नाही
नुकताच बामणडोंगरी रेल्वेस्थानकावरील टीसीला एका अज्ञात प्रवाशाने मारहाण केल्याची घटनादेखील घडली आहे. आज एक वर्ष पूर्ण होत आले तरी स्थानकावर आरपीएफ सेवा उपलब्ध नसल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करीत आहेत. यात आणखी प्रवाशांची भरदेखील पडू शकेल; मात्र रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर आवश्‍यक सोयीसुविधा व प्रवाशांच्या अनुषंगाने त्यांच्या मागण्या पूर्ण करणे गरजेचे आहे.

प्रवाशांचा गोंधळ
नेरूळ किंवा बेलापूर या दोन्ही स्थानकांवरून खारकोपर आणि बामणडोंगरी स्थानकांवर रेल्वे आली असता महिला व अपंगांसाठी राखीव नावे दिलेल्या ठिकाणी ते डबे येत नसल्याने महिला व अपंग प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर फलाटाखालील भुयारी मार्गाजवळ कोणता फलाट नंबर आहे ते लिहिले नसल्याने अनेक वेळा प्रवाशांचा गोंधळ होतो.

सकाळी लवकर रेल्वे चालू झाली पाहिजे. ५ वाजल्यापासून, तसेच रात्री उशिरा १२ वाजेपर्यंत रेल्वे असणे आवश्‍यक आहे. तसेच १५ - १५ मिनिटांनी ट्रेन असली पाहिजे. पश्‍चिम मार्गावरून बेलापूर किंवा नेरूळ तिकीट मागितले तर ते मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सुविधा पुरवाव्यात यासाठी, रेल्वे प्रशासनाकडे मागणी केल्यास रेल्वे प्रशासन सिडकोवर ढकलते. 
- इब्राहिम नाखवा, प्रवासी, उलवे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com