प्लास्टिकबंदीचे एक वर्ष ; कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमक्‍या 

नेत्वा धुरी
शनिवार, 6 एप्रिल 2019

प्लास्टिकबंदीच्या घोषणेला गुढीपाडव्याच्या दिवशी वर्ष पूर्ण होत असले तरी अंमलबजावणी झालेली नाही. घाऊक बाजारांत कारवाई करणाऱ्या महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धमक्‍या दिल्या जात आहेत.

मुंबई -  प्लास्टिकबंदीच्या घोषणेला गुढीपाडव्याच्या दिवशी वर्ष पूर्ण होत असले तरी अंमलबजावणी झालेली नाही. घाऊक बाजारांत कारवाई करणाऱ्या महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धमक्‍या दिल्या जात आहेत. त्यामुळे संवेदनशील भागांत पोलिसांच्या मदतीशिवाय कारवाई न करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. 

मशीद बंदर येथील प्लास्टिकच्या घाऊक बाजारातील दुकानदारांनी एका महिला अधिकाऱ्याला "या भागात पाय ठेवायचा नाही', अशी धमकीच दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या भागात पोलिसांच्या संरक्षणाशिवाय कारवाई करणे शक्‍य नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे तेथील प्लास्टिकविरोधी कारवाई तूर्तास बंद करण्यात आली आहे. 

मुंबईतील इतर भागांत कारवाई करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कमी मनुष्यबळाचे कारण दिले जात आहे. मशीद बंदर वगळता इतर भागांत प्लास्टिकचा फारसा साठा सापडत नाही, असे सूत्रांनी सांगितले. मॉल, मोठी दुकाने, उपाहारगृहे यांनी मात्र प्लास्टिकबंदी पूर्णपणे अमलात आणल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. कारवाईत जप्त केलेले प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी दिले जाते. 

प्लास्टिकचे बाजार 
मशीद बंदर, दादर, कुर्ला पश्‍चिम, मालाड, कांदिवली. 

आतापर्यंतची कारवाई 
- जून 2018 ते मार्च 2019 
- तपास अधिकारी : एमपीसीबीचे 10, महापालिकेचे 300 
- तपासलेली दुकाने : तीन लाख 49 हजार 443 
- कारवाई झालेली दुकाने : 1222 
- वसूल केलेला दंड : एक कोटी 80 लाख 30 हजार रुपये 

कापडी पिशव्यांचे पैसे परत 
लालबागमधील महेश हलवाई या मिठाईच्या दुकानातून मिळालेली कापडी पिशवी जशीच्या तशी परत केल्यास ग्राहकांना पाच ते 10 रुपये परत दिले जातात. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देण्यात आली. 

Web Title: One year of plastic bans