बाप्पाच्या पीओपी मुर्तींबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! वाचा ही महत्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

  • 'पीओपी' बंदीला एका वर्षाची स्थगिती! 
  • केंद्र सरकारचा निर्णय; मूर्तिकारांना दिलासा 

मुंबई :  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदुषणाचे कारण देत पीओपी मूर्तींवर बंदी घातली होती; मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बंदीला एक वर्षासाठी स्थगिती देत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. तसेच, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या सर्व सुधारीत  नियमांना या वर्षी स्थगिती देण्यात आली आहे; मात्र गणेश मूर्तींच्या उंचीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, बृहन्मुंबई मूर्तिकार संघटनेने कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता पाच फूटापर्यंत गणेश मूर्ती तयार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  
राज्यात गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती निर्मितीचे काम काही महिन्यांपुर्वीच सुरू होते. सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तेव्हा राज्यात अर्ध्याहून अधिक मूर्ती तयार होत्या. त्यामुळे मूर्तीकारांचे मोठे नुकसान होणार होते. हाच विचार करून केंद्र सरकारने आपला निर्णय स्थगित केला आहे. त्यामुळे मुर्तीकारांचे नुकसान होणार नाही, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या निर्णयाबद्दल आभार मानले आहे.  

परप्रांतीय कामगार करताय मुंबईला 'जय महाराष्ट्र'; प्रशासनाकडूनही मिळतेय सहकार्य

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित नियमावलीमध्ये मूर्तीच्या उंचीवर बंधने घालण्यात आली होती; मात्र आता त्यालाही स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा गणपतीच्या मूर्तींच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नियमावली स्थगित झाल्याने अनेक मंडळे पुन्हा उंच मूर्ती हवी अशी भूमिका घेतील, अशी भीती आहे. याबाबत नरेश दहिबावकर म्हणाले, समन्वय समितीने दिलेल्या सूचनांमध्ये गणपतीची मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, असे आवाहन केले होते. मूर्तीच्या उंचीचा निर्णय मूर्तिकार आणि मंडळांनी एकत्र बसून घ्यावा. समन्वय समिती त्यात हस्तक्षेप करणार नाही. तसेच, याबाबत राज्य सरकार जी नियमावली देईल तिचेही तंतोतंत पालन केले जाईल, असे दहिबावकर यांनी सांगितले. तसेच, सरकारने ही स्थगिती केवळ एका वर्षासाठी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पीओपी बंदीबाबत 2021 बाबतचे धोरण या वर्षी स्पष्ट करावे, अशी मागणी बृहन्मुंबई मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी केली. 

मुर्तींच्या उंचीचा प्रश्न
केंद्र सरकारच्या सुधारित नियमावलीमुळे अनेक मंडळ लहान मूर्ती मंडळात बसवण्यास तयार झाले होते. परंतु स्थगितीमुळे पुन्हा गणेश मूर्तीच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मूर्तिकारांनी पाच फूटापर्यंत मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थिती मोठ्या मूर्ती बनवणे योग्य नाही. मोठ्या मूर्ती हाताळण्यासाठी जास्त लोक लागतात. त्यामुळे गर्दी होऊ शकते. कोरोना परिस्थितीत गर्दी टाळणे गरजेचे आहे. परंतु नव्या निर्णयामुळे मंडळ लहान मूर्ती बसवण्याबाबत भूमिका बदलू शकतात, अशी भिती आहे. 

सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

 

मुर्तींच्या उंचीचा प्रश्न असला तरी आम्ही 5 फूटांपर्यंत मूर्ती बनवणार आहेत. त्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती मंडळांना हवी असल्यास त्यांनी राज्य व मुंबई महापालिकाची परवानगी घेणे बंधनकारक असेल. त्यामध्ये उंची बाबत स्पष्ट उल्लेख असावा.  त्यानंतर मूर्तिकार मूर्ती तयार करेल. परवानगीची जबाबदारी सर्वस्वी मंडळाची राहिल.
- गजानन तोंडवळकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई मूर्तिकार संघटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One year postponement of 'POP' ban! Decision of the Central Government; Consolation to the sculptors