
नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने कांद्याचे भाव 60 ते 70 रुपयांवर आले आहे. मात्र किरकोळ बाजारात अद्यापही कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. नवी मुंबईसहित पनवेलमधील काही नोडमध्ये कांदा शंभर ते 120 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कांदा दरवाढीचा किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे.
मान्सूनचा हंगाम काही दिवस लांबला गेल्यामुळे शेतात तयार असलेला कांदा खराब झाला. अवकाळी पावसामुळे जमिनीतील कांदा ओलाच राहिला. बाजारात कांद्याच्या मागणीच्या तुलनेत कांद्याचे प्रमाण घटल्याने कृषी उत्पन्न बाजारात कांदा शंभरीपार गेला होता. त्यामुळे कांद्याचे किरकोळ बाजारभावही वधारले. गेला महिनाभर कांदा महाग असल्यामुळे किरकोळ बाजारात कांदा चढ्या भावाने विकला जात आहे; मात्र दोन आठवड्यांपासून पोषक हवामान निर्माण झाल्यामुळे पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येऊ लागला आहे. बाजारातील जुना माल संपला असून, आता नवीन माल मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांत वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या चारशेहून जास्त गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर 60 ते 70 रुपये प्रति किलोच्या दरापर्यंत आले आहेत. रोजचे हेच दर असल्यामुळे घाऊक बाजारात आता कांदा स्थिर होऊ पाहत आहे. मात्र, किरकोळ बाजारात अद्यापही कांद्याचे वधारलेले भाव कमी होण्याचे नाव घेत नाहीत. वाशीत एपीएमसी मार्केट असूनही वाशी सेक्टर- 9 च्या बाजारात शंभर ते 120 रुपयांपर्यंत चांगल्या दर्जाचा कांदा विकला जात आहे. सीबीडी, नेरूळ, सीवूड्स, जुईनगर व सानपाडा या भागातही शंभर रुपये प्रति किलो कांदा विकला जात आहे.
खारघरमध्ये मक्तेदारी
कांद्याच्या वधारलेल्या दरामागे नफा कमावण्यासाठी खारघर परिसरातील पदपथांवर बसलेल्या स्थानिक कांदेविक्रेत्यांकडून मक्तेदारी होत असल्याची चर्चा रंगली आहे. खारघरमधील काही स्थानिकांनी परप्रांतीय भाजीपाला विक्रेत्यांनी एपीएमसीहून कांदा आणून, विक्री करण्याला मनाई केल्याची माहिती एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. स्थानिकांनी आणलेला कांदे परप्रांतीय भाजीपाला विक्रेत्यांनी खरेदी करायचा, अशी सक्ती केली जात आहे. त्यामुळे खारघरमधील सेक्टर- 20 पासून 36 पर्यंतच्या भागातील किरकोळ बाजारात कांदा शंभर रुपयांपेक्षा जास्त प्रति किलोमागे विकला जात आहे.
किरकोळ बाजारातील कांद्याचे दर
ऐरोली - 90 ते 100 रु.
घणसोली - 80 ते 100 रु.
वाशी - 95 ते 100 रु.
नेरूळ - 90 ते 100 रु.
सीबीडी - 85 ते 100 रु.
खारघर - 90 ते 110 रु.
कामोठे - 85 ते 100 रु.
कळंबोली - 90 ते 100 रु.
नवीन पनवेल - 80 ते 100 रुपये
बाजार समितीमध्ये आलेला कांदा
20 डिसेंबर - 74 गाडी
24 डिसेंबर - 99 गाडी
25 डिसेंबर - 100 गाडी
26 डिसेंबर - 82 गाडी
27 डिसेंबर - 98 गाडी
घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करावा लागतो. एवढा कांदा रोजच्या रोज घाऊक बाजारात जाऊन, आणायला जमत नाही. अशा परिस्थितीत किरकोळ बाजारावर आम्हाला अवलंबून राहावे लागते. परंतु त्याचा किरकोळ व्यापाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे.
- ज्योती तुरे, नेरूळ, गृहिणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.