घाऊक बाजारात कांदा 130 रुपये किलो 

सकाळ वृत्तसेवा
06.01 AM

सोमवारी 60 ते 95 रुपये किलो असणारा कांदा मंगळवारी 85 ते 120 रुपये किलोपर्यंत गेला होता. बुधवारी तर कांद्याने उसळी घेत 90 ते 130 रुपयांचा दर गाठला.

वाशी : घाऊक बाजारातील कांद्याची आवक पुन्हा घटण्यास सुरुवात झाली असल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसू लागला आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात सोमवारी 60 ते 95 रुपये किलो असणारा कांदा मंगळवारी 85 ते 120 रुपये किलोपर्यंत गेला होता.

बुधवारी तर कांद्याने उसळी घेत 90 ते 130 रुपयांचा दर गाठला. हा दर या वर्षातील सर्वात उच्चांकी गाठलेला ठरला आहे; तर किरकोळ बाजारात आत्ताच चांगल्या दर्जाचा कांदा 160 ते 170 रुपये किलोच्या घरात गेला आहे. यामुळे सर्वंसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. 

घाऊक बाजारात सध्या अनेक ठिकाणांहून नवीन कांदा बाजारात येत आहे; मात्र या कांद्याची आवक कमीच आहे. शंभर-सव्वाशे गाड्यांच्या जागी केवळ 60 ते 70 गाड्यांची आवक होत असल्याने बाजारात कांद्याची कमतरता आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे 10 ते 15 रुपये किलो असणारे कांदे आत्ता थेट 90 ते 130 रुपये किलोच्या घरात गेले आहेत. गेल्या आठवडाभरापर्यंत हे कांदे 60 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. त्याअगोदर 46 ते 55 रुपये किलोपर्यंत दर आला होता. आता बाजारात नाशिक, पुण्यासह इंदूरमधूनही कांद्याची आवक सुरू झाली आहे, मात्र ती पुरेशी नाही आणि हा ओला कांदा असल्याने तो फारसा टिकणाराही नाही.

तसेच, तो वजनानेही जड आहे. त्यामुळे या कांद्याला घाऊक बाजारात 60 ते 70 रुपये किलोचा दर मिळत आहे; तर जुना आणि उत्तम दर्जाचा असलेला कांदा बाजारात 90 ते 130 रुपये किलोने विकला गेला आहे. या वर्षातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर ठरला आहे. 

किरकोळ बाजारात कांदा 170 रुपये किलो 
बाजारात कांद्याची आवक वाढत नसल्याने दर उतरण्याची शक्‍यता कमीच वाटत असल्याचेच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजारात कांदा खरेदी करताना नागरिकांना हात आखडता घ्यावा लागत आहे. घाऊक बाजारात 90 ते 130 रुपये झालेला कांदा किरकोळ बाजारात 160 ते 170 रुपये किलो झाला आहे. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दरवाढीवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने किरकोळ बाजारात दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्राहकांना चढ्या दराने कांदे खरेदी करावे लागत आहेत. मात्र आवक कमी असल्याने कांद्याची मागणी पूर्ण करणे बाजारात शक्‍य होत नाही आणि त्यामुळे दर वाढण्यास सुरुवात होत असल्याचे व्यापारी सुभाष शेळके यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion in the wholesale market is Rs 130 per kg