गाळे वितरणाच्या प्रक्रियेकरिता ऑनलाईन अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे बृहतसुची (मास्टरलिस्ट) तयार केली जात आहे. या मास्टरलिस्टमधील भाडेकरू रहिवाशांची पात्रता निश्‍चिती व गाळे वितरणाच्या प्रक्रियेकरिता मूळ भाडेकरू अथवा रहिवासी आणि त्यांचे वारसदार यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

मुंबई - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे बृहतसुची (मास्टरलिस्ट) तयार केली जात आहे. या मास्टरलिस्टमधील भाडेकरू रहिवाशांची पात्रता निश्‍चिती व गाळे वितरणाच्या प्रक्रियेकरिता मूळ भाडेकरू अथवा रहिवासी आणि त्यांचे वारसदार यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. 17 जून ते 16 जुलै या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. यासाठी masterlist.mhada.gov.in या म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्जदारांना नोंदणी करावी लागणार आहे. 

स्थलांतर केलेल्यांपैकी हजारो रहिवासी 25-30 वर्षे संक्रमण शिबिरात राहत आहेत. या लोकांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी गेली काही वर्ष मास्टरलिस्ट तयार केली जाते. ज्या उपकरप्राप्त धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत; मात्र काही कारणांमुळे ज्यांचा पुनर्विकास शक्‍य नाही, तेथील रहिवासी, तसेच पुनर्बांधणी झालेल्या उपकरप्राप्त इमारतीत कमी गाळे बांधल्याने तेथे घर न मिळालेले मूळ भाडेकरू किंवा त्यांचे वारसदार हे संक्रमण शिबिरात रहात असतील, त्या सर्वांसाठी म्हाडातर्फे ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. आता यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार असून त्यामुळे वेळ आणि श्रम यात दोघांचीही बचत होणार आहे. म्हाडाच्या www.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्यातील सिटीझन कॉर्नरमध्ये जाऊन मास्टरलिस्टसाठी अर्जाची नोंदणी करता येणार आहे. याशिवाय स्वतंत्र संकेतस्थळाद्वारेही नोंदणी शक्‍य असल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online application for shop