चारपैकी एका भारतीयाला गंडा

पीटीआय
मंगळवार, 19 जून 2018

ऑनलाइन व्यवहारांतील फसवणुकीत वाढ; 24 टक्के ग्राहकांना फटका
मुंबई - देशात डिजिटल व्यवहार वाढत असताना फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. एका अहवालानुसार, चारपैकी एका भारतीयाला ऑनलाइन व्यवहारात गंडा घातला जात आहे.

ऑनलाइन व्यवहारांतील फसवणुकीत वाढ; 24 टक्के ग्राहकांना फटका
मुंबई - देशात डिजिटल व्यवहार वाढत असताना फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. एका अहवालानुसार, चारपैकी एका भारतीयाला ऑनलाइन व्यवहारात गंडा घातला जात आहे.

जागतिक आर्थिक माहिती कंपनी "एक्‍सपिरियन'ने याबाबत अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, सुमारे 24 टक्के भारतीय ग्राहकांची आनॅलाइन व्यवहारात थेट फसवणूक होत आहे. यामध्ये दूरसंचार क्षेत्र, बॅंका आणि किरकोळ क्षेत्रातील ग्राहकांची सर्वाधिक फसवणूक होत आहे.

सुमारे 50 टक्के भारतीय ग्राहक बॅंकांशी सहजपणे व्यक्तिगत माहितीची देवाणघेवाण करतात. याचवेळी 30 टक्के ग्राहक ब्रॅंडेड रिटेलरशी सहजपणे व्यक्तिगत माहितीची देवाण-घेवाण करतात. डिजिटल व्यवहारांमध्ये मोबाईल पेमेंटचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या सरासरी 65 टक्के आहे. भारतातील एकूण ग्राहकांपैकी केवळ सहा टक्के ग्राहक व्यक्तिगत माहितीची देवाण-घेवाण करताना काळजी घेतात. हेच प्रमाण जपानमध्ये 8 टक्के आहे. वेगवेगळ्या सेवा मिळविण्यासाठी व्यक्तिगत माहितीची देवाण-घेवाण 51 टक्के भारतीय ग्राहक करतात.
इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि पर्यटन या क्षेत्रांतील कंपन्या ग्राहकांच्या माहितीचा सकारात्मक वापर करीत आहेत. मात्र, या क्षेत्रातील ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांची संख्याही अधिक आहे. आशिया- प्रशांत विभागातील ऑस्ट्रेलिया, चीन, हॉंगकॉंग, भारत, इंडोनेशिया, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्ये पाहणी करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

डिजिटल सेवांच्या वापरात आघाडीवर
आशिया- प्रशांत विभागात डिजिटल सेवांचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या देशांत भारत प्रथम स्थानी आहे. भारतात डिजिटल सेवा वापरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण 90 टक्के आहे. याचवेळी व्यक्तिगत माहितीची चुकीच्या पद्धतीने देवाण-घेवाण करण्यामध्ये भारतीय ग्राहकांचे प्रमाण 70 टक्के असून, यामध्ये आशिया- प्रशांत विभागात भारत चौथ्या स्थानी आहे.

Web Title: online cheating crime indian