
ऑनलाईन वर्ग, गॅझेट्सच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मानेचे दुखणे, स्नायूंवर येणारा दाब, पाठदुखी आणि तणाव यासारख्या समस्या दिसून येत आहेत, असे अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. सफिउद्दीन नदवी यांनी सांगितले. व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहाराच्या सवयीदेखील या समस्येला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : लॉकडाऊननंतर हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अजूनही शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू असून या वर्गांसाठी गॅझेट्चा वापर वाढला आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मानेचे दुखणे, स्नायूंवर येणारा दाब, पाठदुखी आणि तणाव यासारख्या समस्या दिसून येत आहेत, असे अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. सफिउद्दीन नदवी यांनी सांगितले. व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहाराच्या सवयीदेखील या समस्येला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ऑनलाईन वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेनंतर विश्रांती घ्यावी. प्रथिनयुक्त आहाराचे सेवन करावे तसेच स्ट्रेचिंग करणे, शारीरिक हालचाल आणि व्यायाम करावा. मुलांच्या हातात देण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने आणि व्हिडीओ गेममुळेदेखील त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. गॅझेट्सच्या अतिवापरामुळे स्नायूंवर अतिरिक्त ताण येऊ लागला आहे. हातात सतत फोन पकडल्यानेदेखील हाताच्या स्नायूंवर ताण येतो आणि मोबाईल फोन, टॅबलेट्सच्या वजनामुळे मुलांच्या नाजुक हातांचे स्नायू दुबळे होतात. त्यामुळे हाताची बोटे आणि मान दुखू लागते. स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांच्या मणक्यांवर ताण येऊन शारीरिक समस्या वाढीस लागल्या आहेत. संगणक आणि मोबाईल तसेच टीव्हीच्या पडद्यासमोर बराच वेळ बसल्यामुळे मुलांची बसण्याची पद्धत बदलते. ही मुले पोक काढून बसतात. त्यामुळे त्यांच्या पाठीला बाक येऊ लागला आहे. लॉकडाऊनदरम्यान लहान मुलांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आली, असेही डॉ. नदवी यांनी सांगितले.
नियमित व्यायाम, संतुलित आहाराचे सेवन केल्याने नक्कीच फायदा होतो. व्हिडीओ गेम खेळत असताना किंवा ऑनलाईन वर्गानंतर थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे. योगा, सूर्य नमस्कार, स्ट्रेचिंग, पाठीचे, मानेचे तसेच खांद्याच्या व्यायामाची निवड करा. मानेचा ताण टाळण्यासाठी संगणक आणि मोबाईल स्क्रीन डोळ्यांच्या समान पातळीवर असावा. सकाळी कोवळ्या उन्हात उघडे अभे राहून पुरेसे व्हिटॅमीन डी घ्यावे. प्रथिने समृद्ध आहाराची निवड करा, गुडघ्यांवर ताण येणार नाही अशा अवस्थेत बसणे योग्य राहील. आपल्या मणक्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- डॉ. सफिउद्दीन नदवी, अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालय
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)