नैना क्षेत्रातील ऑनलाईन बांधकाम परवान्यांसाठी ‘नियम्स’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नैना क्षेत्रातील बांधकाम परवानग्या देताना सुलभ व पारदर्शक पद्धत निर्माण व्हावी, याकरिता सिडकोने नियम्स (नैना इन्टेग्रेटेड ॲप्रुव्हल मॅनेजमेंट सिस्टीम) या ऑनलाईन प्रणालीची सुरुवात केली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सोमवारी (ता. २) सिडको भवनात या प्रणालीची सुरुवात करण्यात आली.

नवी मुंबई : नैना क्षेत्रातील बांधकाम परवानग्या देताना सुलभ व पारदर्शक पद्धत निर्माण व्हावी, याकरिता सिडकोने नियम्स (नैना इन्टेग्रेटेड ॲप्रुव्हल मॅनेजमेंट सिस्टीम) या ऑनलाईन प्रणालीची सुरुवात केली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सोमवारी (ता. २) सिडको भवनात या प्रणालीची सुरुवात करण्यात आली.

सिडको महामंडळ विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या ४७४ चौरस किलोमीटर क्षेत्रात नैना हे एक सुनियोजित व अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी युक्त असे शहर विकसित करीत आहे. यामुळे सद्यस्थितीत नैना प्रकल्प क्षेत्रातील बांधकामविषयक परवानगी देण्याचे अधिकार सिडकोकडे आहेत. नैना क्षेत्रात बांधकाम परवाना प्राप्त करण्याशी संबंधित विविध प्रक्रिया या अधिक सुलभ, जलद व पारदर्शकरीत्या पार पडाव्यात याकरिता सिडकोतर्फे नियम्स प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात आली आहे. नैना प्रकल्पाची अंमलबजावणी होत असतानाच ही प्रणाली कार्यान्वित होणार असल्याने नागरिकांना सुलभ व पारदर्शक पद्धतीने बांधकाम परवाना आणि विहित कालावधीत बांधकाम परवाना प्राप्त होणार आहे.

नियम्स प्रणालीमुळे यापुढे नैना क्षेत्रात बांधकाम परवान्याशी संबंधित अर्ज, शुल्क भरणा, परवानगी प्रदान करणे आदी सर्व प्रक्रिया या केवळ ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत. याबाबत सिडकोच्या अधिकृत संकेस्थळावर ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याकरिता स्वतंत्र टॅबही उपलब्ध करून देण्यात आला आहे. नियम्स प्रणाली वापराबाबतची माहिती पत्रके सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

नियम्स प्रणाली हे डिजिटल भारत व ई-प्रशासन या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सिडकोने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. व्यवहार सुलभतेचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनेही हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.
- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For online construction licenses in the Naina area NEAMS system