नवी मुंबईत ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा; पालकांत नाराजी

सुजित गायकवाड
Wednesday, 7 October 2020

वी मुंबई महापालिकेच्या ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. बहुतांश पालकांकडे स्मार्ट फोन आणि चांगली इंटरनेट सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी अनेक महिने शिक्षणापासून वंचित राहिला आहेत.  

नवी मुंबई : देशात राहण्याजोगे शहर, श्रीमंत महापालिकांपैकी एक, पतप्रतिष्ठा असणारी एकमेव महापालिका अशा अनेक बिरुदावल्या मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. बहुतांश पालकांकडे स्मार्ट फोन आणि चांगली इंटरनेट सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी अनेक महिने शिक्षणापासून वंचित राहिला आहेत.  

आनंदाची बातमी : रेवस - रेडी महामार्ग दृष्टीक्षेपात 

महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शहरात 52 शाळा चालवल्या जातात. या सर्व शाळांमध्ये बालवाडी ते दहावीपर्यंत तब्बल 43 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत येणारी बहुतांश विद्यार्थी गरीब घरातील, झोपडपट्टी अथवा गावठाणातील चाळींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांतील आहेत. या मुलांचे पालक हातावर कमावणारे असल्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांचे प्रमाणही कमी आहे. तसेच स्मार्ट फोन असला, तरी तो कमावणाऱ्या व्यक्तीकडे असतो. तसेच अधिक क्षमतेचा प्रभावी इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सहा महिने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वेळापत्रक कोलमडले आहे. 

धक्कादायक : चोरीसाठी आला अन्‌ जखमी झाला

जुलै महिन्यात शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी स्मार्ट फोन असणाऱ्या पालकांचे समाजमाध्यमांवर समूह तयार केले होते. यातून अभ्यास करण्यासाठी एका माहितीपूर्ण कार्यक्रमाची लिंक देऊन पालिकेतर्फे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याचे सांगितले जात आहे; मात्र समूहावर टाकलेली लिंक प्रत्यक्षात किती पालक पाहतात, याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. ही माहिती पाहताना अनेक जाहिरातींचा व्यत्यय येत असल्यामुळे विद्यार्थी एकाग्र होत नाहीत. तसेच प्रत्येक वेळी इंटरनेटचा डेटा खर्च होत असल्याची ओरड पालकांकडून होत आहे. गरीब घरातील मुलांकडे स्मार्टफोन नाही, अशी सुमारे हजारो मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. 

यंदा गणवेश आणि खाऊ नाही? 
प्राथमिक इयत्तांमधील शाळा सुरू करायच्या की नाहीत, याबाबत राज्य सरकार साशंक असल्याने खासगीसहीत महापालिकेच्या शाळा सुरू झाल्या नाहीत; मात्र फक्त नवा गणवेश आणि पोटभर खाऊ मिळतो, या अपेक्षेने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. महापालिकेतर्फे गरीब मुलांना अद्याप वह्यांचे वाटप झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले; परंतु शाळा सुरू होईल की नाही, याबाबत शंका असल्याने पालिकेने अद्याप गणवेश खरेदी केलेला नाही. 

शिक्षण देण्यास महापालिका कटिबद्ध 
गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यास महापालिका कटिबद्ध आहे. महापालिका शाळेत जाणाऱ्या किती मुलांकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेटची सुविधा आहे, हे पाहण्यासाठी शिक्षण विभागाने एक सर्व्हे केला आहे. त्यानुसार सुमारे एक हजार 92 विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. आता ऑनलाईनवर उपस्थिती वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ज्या पालकांच्या मुलांकडे स्मार्टफोन नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी गृहभेटी देणे, स्वयंअध्ययन असे वेगवेगळे पर्याय चाचपडून वेगळी व्यवस्था करण्याचे विचाराधिन आहे. कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी जास्तीत जास्त भर दिला जाईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online education stopped in Navi Mumbai; Students waiting for education