रुग्णवाहिकांचा तुटवडा! एनएमएमटीने लढवली नामी शक्कल

Conversion of NMMT bus to ambulance
Conversion of NMMT bus to ambulance

नवी मुंबई : कोरोनाबधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे. शहरात रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवत असल्याने महापालिका एनएमएमटीच्या ताफ्यातील 8 बस रस्त्यावर उतरवणार आहे. एनएमएमटी प्रशासनाने अंतर्गत बदल करून रुग्णांची ने-आण करता येईल अशा सहा बस रुग्णवाहिकेत रूपांतर केल्या आहेत.

एखाद्या रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याला आणण्यासाठी महापालिका रुग्णवाहिका पाठवते. महापालिकेच्या ताफ्यात सध्या 12 रुग्णवाहिका असून यातील 5 रुग्णवाहिका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आरटीओतर्फे उपलब्ध झाल्या आहेत.

कोरोना रुग्णांची ने-आण करताना महापालिकेला इतर सामान्य रुग्णांसाठी देखील रुग्णवाहिका उपलब्ध करावी लागत आहे. रुग्णवाहिकांच्या तुटवड्यामुळे पालिकेला खासगी रुग्णवाहिकांची मदत घ्यावी लागत होती. ही सेवा महागडी ठरत असल्याने पालिकेने एनएमएमटीच्या ताफ्यातील 8 बस रुग्णवाहिकेत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. 

आतापर्यंत एनएमएमटीच्या चार मिनी बसमध्ये अंतर्गत बदल करून त्यांचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले आहे. कोरोनामुळे क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या रुग्णांची ने-आण करण्यासाठी एनएमएमटीने रुपांतरीत केलेल्या बसचा वापर केला जाणार आहे. या बस पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेल्या असून त्यात रुग्णांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात दाखल होणाऱ्या एनएमएमटीच्या सहापैकी 4 बस संपर्कातील नागरिकांची ने-आण करण्यासाठी वापरात आणली जात आहे. वाशी रुग्णालयात 2, इंडिया बुल्स आणि ऐरोली येथे प्रत्येकी एक अशा चार बसचा वापर केला जाणार आहे.

वाशी रुग्णालयात 3 रुग्णवाहिका तैनात
नवी मुंबईत सुमारे एक हजार 128 कोरोना रुग्ण आहेत. तर 200 पेक्षा जास्त रुग्णांना विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. गंभीर लक्षणे नसलेल्या कोरोनाच्या बहुतांश रुग्णांना पनवेलजवळील इंडिया बुल्स सोसायटीत पालिकेने तयार केलेल्या कोव्हिड केअर केंद्रात ठेवण्यात येत आहे. रुग्णवाहिकांचे नियोजन करताना कोरोना रुग्णांसाठी वाशीच्या रुग्णालयात 3 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यातील एक रुग्णवाहिका फक्त कोरोनामुळे मृत झालेल्या शवांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. 

...असे आहे रुग्णवाहिकांचे नियोजन
सर्वसाधारण रुग्णांसाठी 2 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. वाशी सेक्टर 14 येथील दुसऱ्या कोव्हिड केअर केंद्रासाठी एक रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. तर नेरूळ येथील रुग्णालयात 5 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या असून 3 कोरोनाच्या रुग्णांसाठी तर 2 सामान्य रुग्णांसाठी तसेच, ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयातही दोन रुग्णवाहिका कोव्हिड रुग्णांसाठी तर दोन रुग्णवाहिका सामान्य रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयात एक रुग्णवाहिका सर्वसाधारण रुग्णांसाठी तर एक रुग्णवाहिका कोव्हिड रुग्णांसाठी ठेवण्यात आली आहे.                                       
एनएमएमटीच्या रुपांतरीत केलेल्या बसचा तात्पुरता वापर केला जाणार आहे. कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची ने-आण करण्यासाठी या बसचा वापर होणार आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, 
नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com