जून महिन्यात केवळ 10 टक्केच पाऊस बरसण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या वायू या तीव्र चक्रीवादळाची बदलती दिशा लक्षात घेता मान्सूनचे राज्यातील आगमन आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या वायू या तीव्र चक्रीवादळाची बदलती दिशा लक्षात घेता मान्सूनचे राज्यातील आगमन आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. वायूचा प्रभाव अजून दोन दिवस राज्यावर राहणार असल्याने कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचलेला मान्सून दक्षिण कोकणात अजून विलंबाने पोहोचणार आहे. त्यामुळे पावसाच्या मुंबईच्या आगमनाला पुढल्या आठवड्याचा मुहूर्त मिळण्याची शक्‍यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले. 

जून महिन्यात राज्यात 15 टक्के पाऊस होतो; मात्र मान्सूनला झालेल्या विलंबामुळे जून महिन्यात राज्यात केवळ 10 टक्केच पाऊस पडणार असल्याची भीती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

यंदा आठवडाभर उशिराने केरळात दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे अडथळे निर्माण होत आहेत. मंगळवारी अरबी समुद्रात तयार झालेले वायू चक्रीवादळ बुधवारी गुजरात येथील वेरावळ आणि महुआ किनारपट्टीला धडकणार होते, परंतु बुधवारी मध्यरात्री वायूने आपली दिशा पूर्वेकडे वळवली. शनिवारी वायू गुजरातच्या उत्तर किनारपट्टीकडे सरकत असल्याचे दिसून आहे. सोमवारी सौराष्ट्रच्या उत्तर किनारपट्टीला वायू वादळ धडकणार असल्याचे केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजात सांगण्यात आले; मात्र त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील वायू चक्रीवादळाचा प्रभाव संपलेला नाही. त्यामुळे दक्षिण कोकणमार्गे राज्यात प्रवेश करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना जूनच्या तिसऱ्या आठवड्यातच प्रवेश मिळेल, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 10 percent of rain in the month of June