गृहप्रकल्पांना घरघर; सहा महिन्यांत फक्त 27 हजार परवडणारी घरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

घर विक्री न होण्याची कारणे...
घरांच्या न परवडणाऱ्या किमती
घरांच्या किमती कमी होण्याच्या प्रतीक्षेत असलेले ग्राहक
गृहप्रकल्पांच्या परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी होत असलेला विलंब

मुंबई - घरांच्या न परवडणाऱ्या किमतीचा मोठा फटका गृहप्रकल्पांना बसला आहे. त्यामुळे महामुंबईत ८० हजार २०० कोटी; तर पुण्यात तब्बल सात हजार कोटी रुपयांचे गृहप्रकल्प रखडले आहेत. गेल्या सहा महिन्यांत महामुंबई आणि पुण्यात ७८ हजार घरांची निर्मिती झाली असून, त्यातील फक्त २७ हजार घरे परवडणारी असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे परवडणारी घरे निर्माण करण्याच्या सरकारच्या योजनेला ‘खो’ बसला.

ॲनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टन्स या कंपनीने हा अहवाल जाहीर केला आहे. मुंबईत ३८ हजार ६० घरांचे प्रकल्प रखडले आहेत, तर पुण्यात २८ प्रकल्पांतील ९६५० घरांची बांधणी रखडली आहे. केंद्र सरकार ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना युद्धपातळीवर राबवत असतानाच राज्यातील दोन महत्त्वाच्या विभागांमध्ये परवडणारी घरे गरजेपेक्षा कमी निर्माण होत आहेत. गेल्या सहा महिन्यांत महामुंबईत ४९ हजार ८९० घरे तयार झाली. त्यातील १७ हजार ७०० घरे परवडणारी होती, तर पुण्यात २८ हजार २२० घरे तयार झाली. त्यातील ९३५० घरे परवडणारी होती. हे प्रकल्प रखडल्याचा परिणाम घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांवरही होत आहे, असे ॲनरॉकचे संचालक अनुज पुरी यांनी सांगितले.

सरकारी व्याख्येनुसार ४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची किंवा ६४५ चौरस फुटांपर्यंतची घरे परवडणारी घरे मानली जातात. केंद्रीय अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांच्या गृहकर्जाच्या व्याजावर दीड लाखापर्यंतची अतिरिक्त सूट देण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्याची परवडणाऱ्या घरांची संख्या पाहता याचा फायदा कमी ग्राहकांना होणार आहे, असेही पुरी यांनी सांगितले.

घरांना घरघर
या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महामुंबईत दोन लाख २२ हजार ३२७ घरे विक्रीविना पडून होती. त्यानंतर तीन महिन्यांत त्यात एक हजार घरांची वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत महामुंबईत दोन लाख २४ हजार घरे विक्रीविना पडून आहेत, तर पुण्यात २०२ नव्या घरांची भर पडली आहे. या वर्षाच्या सुरवातीला पुण्यात ९२ हजार ७९१ घरे रिकामी होती, तर जूनअखेरपर्यंत हा आकडा ९२ हजार ५८५ पर्यंत पोचला आहे.

घर विक्री न होण्याची कारणे...
घरांच्या न परवडणाऱ्या किमती
घरांच्या किमती कमी होण्याच्या प्रतीक्षेत असलेले ग्राहक
गृहप्रकल्पांच्या परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी होत असलेला विलंब


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 27 thousand affordable homes in six months