हृदयामुळे कित्येक वर्ष बसून झोपणाऱ्या 36 वर्षीय नायजेरीयन तरुणाला जीवदान

हृदयामुळे कित्येक वर्ष बसून झोपणाऱ्या 36 वर्षीय नायजेरीयन तरुणाला जीवदान

मुंबईः नायजेरियावरून आलेल्या ऑन्येका पास्कल ओबोडोडाइक नावाच्या 36 वर्षीय रुग्णावर हृदयाची झडप बदलण्याची अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत त्याला जीवदान दिले आहे. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 

ऑन्येकाला हृदयाच्या झडपेचा आजार असल्याचे निदान 2007 मध्‍येच झाले होते. मात्र परिस्थिती बेताची असल्याने त्याने पुढील उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला घेतला नाही. 2015 मध्‍ये ऑन्येका खूप आजारी पडला आणि तपासण्या केल्यावर त्याचा आजार बळावला होता. जेमतेम 100 मीटरहून जास्त चालणे किंवा आडवे झोपणे जमेनासे झाले. गेली 5 वर्षे त्याला खुर्चीवर बसल्याबसल्याच झोप घ्यावी लागत होती. 

ऑन्येकाने मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाशी संपर्क साधला आणि तिथल्या डॉक्टरांनी त्याचे मनोबल वाढवले.  भारतात आल्यानंतर या रुग्णाची संपूर्ण तपासणी केली गेली. त्यात रुग्णाला र्हुमॅटिक हार्ट डिझिज असल्याचे दिसून आले, त्याचबरोबर हृदयाच्या दोन मुख्य झडपांमध्ये गळती (ओरटिक आणि मिट्रल) असल्याचे, इजेक्शन फ्रॅक्शनचे प्रमाण अवघे 15 टक्‍के असल्याचे, (हृदयाची रक्ताभिसरणाची किंवा पम्पिंग क्षमता अत्यंत कमी असल्याचे ) व त्यातून किडनी निकामी होण्याची समस्याही उद्भवल्याचे दिसून आले.

रुग्णाची हार्ट फेल्युअरची स्थिती गंभीर टप्प्यावर पोहोचली होती त्यामुळे आधी त्याला हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. मात्र रुग्ण व त्याच्या कुटुंबियांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला नकार दिला व त्याऐवजी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट अर्थात झडपा बदलण्याच्या प्रक्रियेचा पर्याय निवडला.

फोर्टिस रुग्णालयातील कन्सल्टन्ट- कार्डिओ थोरॅसिस अँड व्हॅस्क्युलर सर्जरी डॉ. मनीष हिंदुजा यांनी सांगितले की, “हा रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा त्याच्यामध्ये गंभीर टप्प्यावर पोहोचलेल्या हार्ट फेल्युअरची लक्षणे दिसत होती व त्याजोडीला रीनल फेल्युअरही झाल्याचे दिसले. रुग्णाला चालता, झोपता येत नव्हते व संपूर्ण शरीराला सूज आली होती. अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दगावण्याचे प्रमाण लक्षणीय असते. (4 पैकी सुमारे 1). मात्र ढासळती तब्येत विचारात घेऊन रुग्णाने या शस्त्रक्रियेला संमती दिली. या केसचे महत्त्व असाधारण असण्याचे कारण म्हणजे, इतक्या गंभीर स्वरूपाचे कार्डिअक आणि रीनल फेल्युअर असताना, इजेक्शन फ्रॅक्शन अवघे 15 टक्‍के असताना बहुतांश सर्जन्सकडून अशा आव्हानात्मक शस्त्रक्रियेचा पर्याय वापरला गेला नसता. आमच्या विशेषज्ज्ञांच्या पॅनलच्या मदतीने आम्ही ही प्रक्रिया अत्यंत अचूकतेने पार पाडली व त्यातून सकारात्मक परिणाम हाती आला.”

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला 7 दिवसांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले व त्यानंतर त्याला वॉर्डमध्ये हलवण्यात आले. वॉर्डमध्ये आल्यावर रुग्णाने कुणाच्याही आधाराशिवाय चालायला सुरुवात केली. कार्डिअक आणि रिनल फेल्युअरमधून बरे होताना त्याच्या शरीरात साठलेल्या 24 किग्रॅ. वजनाच्या द्रवाचा निचरा झाला. आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून तो मायदेशी परतला आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Onyeka Pascal Obododaik replace heart surgery successfully Fortis Hospital Mulund

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com