काँग्रेसच्या माघारीने सेनेचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

मुंबई महापौर निवडणुकीतही राज्याच्या सत्तापेचाचे पडसाद

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेमधील पेचप्रसंगाचे पडसाद मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीत उमटले. महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेबाबत अजूनही अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नव्हते. अखेरीस भाजपप्रमाणे काँग्रेसनेही माघार घेतली, त्यामुळे शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

शिवसेना-भाजप युती तुटली किंवा महाशिवआघाडी अस्तित्वात आली, तरी संख्याबळ भाजपच्या तुलनेत अधिक असल्याने शिवसेनेलाच महापौरपद मिळणे निश्‍चित होते. युती तुटल्यास विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडून भाजपकडे जाण्याची शक्‍यता होती. अशा स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेतील सत्तेत वाटा देणे शिवसेनेला भाग पडले असते.

भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी नगरसेवकांची पळवापळव करण्याशिवाय पर्याय नव्हता; मात्र राज्यातील परिस्थिती पाहता ते अडचणीचे होते. त्यामुळेच भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली.  स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची महापौरपदी वर्णी लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती; तसेच अन्य नावेही चर्चेत होती. तथापि, ऐनवेळी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्‍चित झाले.

वरळीतील विधानसभा निवडणूक त्यांना फायद्याची ठरली. स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेच्या नगरसेविकेला मिळेल अशी चर्चा आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाशिवआघाडीची सत्ता स्थापन झाल्यास मुंबई महापालिकेतील संख्याबळानुसार काँग्रेसला उपमहापौरपद मिळण्याची शक्‍यता होती. भाजपने माघार घेतल्याने आणि काँग्रेसनेही उमेदवार न दिल्याने शिवसेनेचा विजय सोपा झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open the path of Shivsena with the back of Congress