
मुंबई : देशभरातील आयआयटींमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शैक्षणिक आरक्षणाला धक्का लावण्यात येत असल्याचा आरोप, आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल आयआयटी मुंबई (एपीपीएससी) ने केला आहे. आयआयटीमधील घटनात्मक आरक्षण कायम ठेवण्याची मागणी संघटनेने केली आहे. आयआयटीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आरक्षणाला धक्का लावण्याची शिफारस केली असून ती कदापि मान्य करण्यात येणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
आयआयटीमध्ये शैक्षणिक आणि प्रशासकीय नियुक्तीवेळी गेली अनेक वर्षांपासून घटनात्मक आरक्षणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली नाही. याकडे विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांनी लक्ष वेधल्यानंतर केंद्र सरकारने आयआयटीमध्ये शिक्षकांची नियुक्ती आणि शैक्षणिक आरक्षण राबविण्याबाबत समिती स्थापन केली. आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही.आर.राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये इतर आयआयटींतील संचालकांचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालात आरक्षणाची अंमलबजावणी करण्याऐवजी आरक्षण लागू न करण्याची सक्ती नसावी, अशी शिफारस केली असल्याचे, एपीपीएसपी संघटनेच्या समन्वयकाने सांगितले. यासोबतच शैक्षणिक आरक्षणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची शिफारस करण्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी पीएचडीपुर्वी दोन वर्षांचा कोर्स असावा, अशी शिफारस केली आहे. हा कोर्स केल्यानंतरही पीएचडीची हमी देता येणार नसल्याचेही या शिफारशींमध्ये नमूद केले असल्याचे, समन्वयकाने सांगितले.
हा अहवाल आरक्षण विरोधी असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळालेला घटनात्मक हक्क नाकारत आहे. त्यामुळे हा अहवाल सरकारने स्विकारू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत आयआयटींमध्ये नाकारलेल्या आरक्षणाच्या जागांची यादी तयार करून ती जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आरक्षणाच्या रिक्त जागा भरण्यासाठी कार्यक्रम जाहीर करावा, अशी संघटनेची मागणी आहे. संघटनेच्या विरोधानंतरही सरकारने हा अहवाल स्विकारल्यास त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा संघटनेने दिला आहे.
( संपादन - सुमित बागुल )
Oppose to the removal of reservations in IITs Demand to maintain constitutional reservation
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.