आरे कारशेडला कांजूरमार्गचा पर्याय

आरे कारशेडला कांजूरमार्गचा पर्याय

मुंबई : मेट्रोच्या कुलाबा-वांद्रे सिप्झ या तिसऱ्या टप्प्यासाठी गोरेगाव येथील आरे वसाहतीतील प्रस्तावित कारशेडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्थगिती दिली. त्यामुळे आता पुन्हा कांजूरमार्ग येथील जागेचा पर्याय पुढे आला आहे.

आरेमध्ये कारशेड बांधण्याऐवजी कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्याच्या पर्यायाचा अभ्यास मेट्रो महामंडळाने केला होता. मात्र, हा पर्याय खर्चिक असल्याने महामंडळाने आरेत कारशेडचे काम सुरू केले आहे. त्यावर मेट्रोच्या जोगेश्‍वरी-विक्रोळी या टप्प्यासाठी कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ४१ हेक्‍टर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. तेथेच कारशेड बांधावी, अशी मागणी झाली होती. मात्र, सरकारने न्यायालयात या ठिकाणी कारशेड बांधता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

तिसऱ्या टप्प्याची आखणी करताना महालक्ष्मी रेसकोर्स येथे ११ हेक्‍टर भूमिगत कारशेड बांधण्याचा विचारही पुढे आला होता. मात्र, हा पर्यायही मागे पडला होता. त्यात आरेतील कारशेडला विरोध करणाऱ्यांनी कांजूरमार्गचा पर्याय आतापर्यंत लावून धरला आहे.
 

कांजूरमार्गबाबत यापूर्वीच्या सरकारची भूमिका
     सिप्झपासून कांजूरमार्गपर्यंत १० किलोमीटरचा भुयारी मार्ग बांधावा लागणार.
     कांजूरमार्ग येथील प्रस्तावित जमिनीवर खासगी व्यक्तीने दावा सांगितला आहे. त्यामुळे हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.
     न्यायालयाचा निकाल त्या व्यक्तीच्या बाजूने लागल्यास जमिनीचा मोबदला म्हणून ५२०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
     ही जागा पाणथळ असल्याने त्यावर भरणी करावी लागेल, यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.

याचिकाकर्त्यांनी सुचवलेले पर्याय
     मेट्रोच्या सहाव्या टप्प्यासाठी कांजूरमार्ग येथील ४१ हेक्‍टर जमीन निवडण्यात आली आहे. त्यावर दोन्ही टप्प्यांचे कारशेड होऊ शकते.
     मेट्रोच्या घाटकोपर अंधेरी वर्सोवा टप्प्याचे कारशेड ९ हेक्‍टरमध्ये आहे.
    तिसऱ्या टप्प्याचे कारशेड २५ हेक्‍टरवर बांधण्यात येणार आहे. जगात कोठेही मेट्रोच्या कारशेडसाठी एवढी जमीन वापरलेली नाही.
     कांजूरमार्गच्या ४१ हेक्‍टरवर कारशेड सहज होऊ शकते. कोणत्याही विकासकामात पर्यावरणाचा विचारही करायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com