कालबाह्य रूढी-परंपरा बदलाव्यातच! 

कृष्णा जोशी
गुरुवार, 1 जून 2017

हिंदू धर्मातीलच कालबाह्य रूढी बदलाव्यात, वाईट परंपरा मोडून काढाव्यात, असे मत नुकतेच "सकाळ'मध्ये व्यक्त झाले. त्यानंतर अनेक ज्ञाती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या मताला पाठिंबा व्यक्त केला; मात्र असे बदल करण्यापूर्वी समाजात व्यापक चर्चा व्हावी, असे आग्रही प्रतिपादन सर्वांनी केले. त्यापैकी काही प्रमुख मत-मतांतरे... 

हिंदू धर्मातीलच कालबाह्य रूढी बदलाव्यात, वाईट परंपरा मोडून काढाव्यात, असे मत नुकतेच "सकाळ'मध्ये व्यक्त झाले. त्यानंतर अनेक ज्ञाती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या मताला पाठिंबा व्यक्त केला; मात्र असे बदल करण्यापूर्वी समाजात व्यापक चर्चा व्हावी, असे आग्रही प्रतिपादन सर्वांनी केले. त्यापैकी काही प्रमुख मत-मतांतरे... 

परंपरा काळाबरोबर बदलायलाच हव्यात 
काळाप्रमाणे आपण आपल्या रूढी-परंपरा बदलणे आवश्‍यक आहे. हल्ली बऱ्याच कालबाह्य रूढी कमी होत आहेत, आज बऱ्याच विधवा महिलाही मंगळसूत्र घालतात, कुंकू लावतात. अर्थात यामागे कोणाची वाईट नजर आपल्यावर पडू नये, हा व्यावहारिक हेतूही असतोच. पती निधनानंतरही महिलांनी मंगळसूत्र, कुंकू यांचा त्याग करू नये यासाठी आमच्या समाजातील पुरुषोत्तम शेटे यांनी पंधरा वर्षांपूर्वी जनजागृती सुरू केली. अंत्यविधीदरम्यान महिलांच्या बांगड्या फोडण्याची प्रथाही बंद करण्याचा आग्रह त्यांनी धरला, त्यासाठी त्यांनी गावागावांत जाऊन प्रबोधन केले. त्यामुळे हे चांगले बदल झाले. अशा अनेक प्रथा बदलण्याची गरज आहे, लग्नापूर्वीचा हळदीचा विधी आता इव्हेंट झाला आहे. यात रूढी कमी आणि मौजमजाच जास्त होते. यातील खर्च कमी केला, दारू-मटणाच्या पार्टी बंद केल्या तर चांगलेच होईल. सर्वजातीय समाजही त्याला पाठिंबा देतील, हा पैसा समाजातील गरजू व्यक्तींना देण्याचे भानही समाजात येईल. 
अर्थात हे बदल करण्यापूर्वी समाजात चर्चा व्हावी, एखादे मत मांडून लगेच त्यावर कृती होत नाही. याबाबत कोणीतरी पुढाकार घेऊन लोकांना जाणीव करून द्यायला हवी, तर सर्वच समाज त्यास पाठिंबा देतील. 
- प्रदीप गांगण 
कोकणस्थ वैश्‍य समाज, सेक्रेटरी 

बदल करण्यापूर्वी व्यापक चर्चा व्हावी 
आपल्या जुन्या रूढी त्यांच्याजागी योग्य आहेत; पण त्यातही काही रूढी काळाशी सुसंगत नसतील तर त्यात काळानुरूप बदल केलेच पाहिजेत. मृत्यूनंतर तेरा दिवसांचा दुखवटा असतो व त्याच काळात भावकीत किंवा गावकीत कोणाकडे लग्न असेल तर त्यांची अडचण होते. त्यामुळे हे दुखवट्याचे दिवस तेराऐवजी तीन-चार दिवसांतच आटोपून गावाला आणि नातलगांनाही मोकळे करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य आहे. अर्थात असे बदल करतानाही समाजात व्यापक चर्चा व्हावी, अशा बदलांची सक्तीही कोणावर करू नये, असे मला वाटते. 
काही समाजांमध्ये लग्नापूर्वीच्या हळदी कार्यक्रमात दारू-मटण पार्टी दिली जाते. अशा अनिष्ट बाबी टाळून आनंदाने समारंभ साजरे करावेत. हळदी कार्यक्रमातही परंपरेनुसार देवपूजा केली तर आपली संस्कृतीही पाळली जाईल. 21 व्या शतकात आपल्याला पुढे जायचे असेल तर जुन्या परंपरांची बंधने मागे ठेवायला हवी. काळानुसार चालायला हवे. जुनी बंधने शिथिल केली तर सर्वांनाच बरे वाटेल. महिला पुरुष यांच्यातही समानता यायलाच हवी; पण ती आपल्या मनात असावी, केवळ वरवरचा देखावा करू नये. 
- अविनाश पवार 
अध्यक्ष, भारतीय मराठा संघ 

तेरा दिवस घरी बसणे परवडत नाही 
ज्या जुन्यापुराण्या रूढींना आताच्या काळात काही आधार नसेल, त्या बदलायलाच हव्यात, असे मला स्वतःला वाटते. अनेकदा या रूढी बदलण्याची आपली इच्छा असूनही घरातील ज्येष्ठांना काय वाटेल म्हणून आपण त्या बदलण्यास कचरतो; पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताची आधुनिक तरुण पिढी हळूहळू आपोआपच या रूढी बदलण्यास कारणीभूत ठरत आहे. पूर्वीपासून आमच्या समाजात देवीसमोर बोकडाचा बळी द्यायची पद्धत होती; मात्र आता रक्त बघूनच घाबरणारी नवी पिढी आली असल्याने पुढे या रूढीचे काय होणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. अनेक सीकेपी घरांमध्ये नवरात्रीत अष्टमीला मद्यपानाचा कार्यक्रम असतो. आता आपण मद्यपान केव्हाही करू शकतो, तसे ते ज्याला वाटेल त्याने केव्हाही करावे; मात्र देवीचे कारण सांगून मद्यपान करू नये, असे मला वाटते. त्या दिवशी मद्यपान केले नाही तर देवीचा कोप होईल, असे काहीही नसते. कोणत्याही धार्मिक विधींवर हजारो रुपये खर्च न करता घरगुती स्वरूपात विधी व नातलगांना जेवण देऊन हा खर्च टाळणे सहज शक्‍य आहे, गरजूंनाही ती रक्कम देता येईल. 
आता तेरा-तेरा दिवस चालणारे सुतक, देवांना अंधारात ठेवणारे पाच दिवसांचे सोयर या विधींबाबत मला असे वाटते की देवावर असे निर्बंध नसावेत. अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. आमच्या समाजात अनेक व्यक्तींचे व्यवसाय असल्याने आम्हाला तेरा दिवस घरी बसणे परवडतच नाही. आम्ही तीन दिवसांनी शोकसभा घेऊन आमचे व्यवहार पूर्ववत सुरू करतो, याबाबत आम्ही गुजराती व्यापाऱ्यांची पद्धत उचलली आहे. कोणी गेल्याचे दुःख तसे पाहिले तर आयुष्यभरच आपल्याबरोबर राहते; पण म्हणूनच पहिल्या तेरा दिवसांच्या काळात देवळात न जाण्याचे काही कारण असेल असे मला तरी वाटत नाही; पण सोयर पाळतानादेखील देवळात का जाऊ नये हे मला कळत नाही. बाळबाळंतिणीकडेच सर्व घराने लक्ष द्यावे यासाठी पाहुण्यांची घरात गर्दी नको. घरच्यांनी अगदी देवाचेही न करता बाळबाळंतिणीकडे लक्ष द्यावे, असा उद्देश त्यामागे असावा; पण खरे सांगायचे तर आधुनिक काळात या प्रथा आपोआप बदलत चालल्या आहेत. 
समीर गुप्ते, 
विश्‍वस्त, सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट 

जन्म-मृत्यू अपवित्र नाहीच 
जन्म किंवा मृत्यू (मोक्ष) हे अपवित्र नाहीच. त्या नैसर्गिक क्रिया आहेत, त्यामुळे त्यानंतरच्या दिवसांमध्येही देवदर्शनाला हरकत नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. दहावा, तेरावा हे विधी आपण वैयक्तिक पातळीवर करतो; मात्र या दिवसांतही आता कोणी घरी बसत नाही. आपल्या कामधंद्याला लागते. त्यामुळे दोन-तीन दिवसांनंतर देवळात जायलाही हरकत नाही. बाकी गोष्टी आपल्या मनाला पटेल तशा कराव्यात. पूर्वी बारा बलुतेदारीच्या काळात पुरोहितांचा पोटापाण्याचा तो व्यवसायच होता म्हणून त्यांना दान दिले जात असे. आता गरिबाला दान देण्यासही हरकत नाही. 
आधुनिकतेच्या या युगात आता रूढी-परंपरा-प्रथा यांचे अवडंबर कमी होते आहे. समाजाने जुन्या प्रथा मागे सारून पुढे जायलाच हवे, खरे पाहता ही प्रक्रिया आपल्या नकळत सुरूच असते. आम्ही आमच्या कार्यकारिणीतील महिला सदस्यांनाही या रूढी न पाळण्याची मुभा देतो. निर्मिती प्रक्रियेतील काही नैसर्गिक बाबींचा काळही पवित्रच असतो, त्यामुळे त्या काळातही महिलांना हळदी-कुंकू, धार्मिक उत्सव यापासून दूर राहू नये असाच आमचा आग्रह असतो. कालबाह्य रूढी बदलायलाच हव्यात. 
- विजय अंबर्डेकर, 
अध्यक्ष, अखिल भारतीय कऱ्हाडे ब्राह्मण महासंघ 

फॅशन म्हणून रूढींची मोडतोड नको 

कालानुरूप रूढी-परंपरांमध्ये बदल आवश्‍यक आहे. केवळ एखादी रूढी जुनी आहे म्हणून ती टाकाऊ होते की तिच्यामागची कारणे कालबाह्य झालीत म्हणून या मुद्द्यावर मनभिन्नता असू शकते. उदा- पूर्वी चार दिवस स्त्रिया अस्पर्श बसायच्या. त्यांना आराम देण्यासाठी ही प्रथा होती. आज नोकरदार स्त्री किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलगी ती परंपरा पाळत नाही आणि त्याबद्दल कोणी आक्षेपही घेत नाही. सोयर या विधीमागील शास्त्र म्हणजे ओल्या बाळंतिणीला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला बाहेर नेले तर संसर्गजन्य रोग होऊ शकतात; पण त्या काळातही नामजप किंवा मनातल्या मनात प्रार्थनेला कुठे मज्जाव आहे. घरातील देवाच्या मूर्तींना व फोटोंना नमस्कार करण्याला काही हरकत नाही. घरात गरुडपुराण वाचन केले तर आराधना त्यातून होते की. देवळात जाऊनच देव भेटतो असे थोडेच आहे? सोयर-सुतकाच्या काळातही देवळात खऱ्या भक्तिभावाने जायचे असेल तर जरूर जावे; पण त्याची जाहिरात करू नये आणि उगाच फॅशन म्हणून मुद्दाम रूढी तोडण्यासाठी जाऊ नये. सुतकातील 13 दिवस आताही शिक्षित लोक पळत नाहीत. ते केशवपन करत नाहीत किंवा 13 दिवस घरी थांबत नाहीत. पुरुषांनी डोक्‍याचे केस काढण्यामागील व्यावहारिक कारण म्हणजे केस कापलेल्या व्यक्तीला पाहून त्याच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, हे समोरच्याला कळते आणि तो सांत्वनपर भाषेत बोलतो, त्यामुळे दुःख कमी होते व माणूस बाह्य जगात वावरायला तयार होतो. आपण दिवस श्रद्धा पक्ष पाळतो त्यामागे आपल्या पूर्वजांची आठवण ठेवणे व त्यांना श्रद्धापूर्वक नमन करणे हा हेतू आहे. एक दिवस आपणही पूर्वज होऊ हाही संदेश तिथे आहे. या रूढींमध्ये खर्च न करता ते पैसे गरिबांना दान करायचे की नाही हा विवादास्पद विषय आहे. हे विधी करूनही दानधर्म करता येतो. आपण इतर वेळी चैनीत एवढा पैसा खर्च करतो; मग फक्त धार्मिक विधींमधील पैसे गरिबांना दिले पाहिजे, असा आग्रह का? दर महिन्याला चैनीला थोडी कात्री लावून आपण गरजूंना मदत करू शकतो. 
- प्र. अलोणी, (जोशीकाका) 
प्रवक्ते : अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ. 

Web Title: Out-of-date Tradition change!