सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजप नेते आक्रमक, नेते-कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कृष्ण जोशी
Tuesday, 13 October 2020

अनलॉक नंतरही बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. 

मुंबई: अनलॉक नंतरही बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. 

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषद आमदार प्रसाद लाड, माहिमच्या नगरसेविका शीतल देसाई आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सिद्विविनायक मंदिरासमोरील रस्त्यावर बसून आंदोलन केल्याने त्यांना पोलिसांच्या गाडीतून सैतान चौकी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांचा तपशील नोंदवून त्यांना सोडून देण्यात आले. 

सणासुदीचे दिवस येत असल्याने राज्यातील मंदिरे उघडावीत या मागणीसाठी हे आंदोलन केल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. सकाळीच भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज हाती घेऊन घोषणा देत आंदोलन केले. मंदिरं चालू मंदिर बंद उद्धवा तुझा कारभारच धुंद अशा घोषणा लिहिलेले  फलकही या नेत्यांच्या हातात होते. 

अधिक वाचाः  तर राज्यातल्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, महिला सुरक्षेसाठी भाजपचे आंदोलन

अनलॉकच्या पुढच्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात बार उघडले पण अद्याप मंदिरे सुरु झाली नाहीत.  कर्नाटक, गुजरातमध्ये मंदिरे उघडली, तिरुपतीचे मंदिरही खुले झाले. आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब, सहपरिवार पंढरपूरला गेले होते. तरीही अजून राज्यातील मंदिरे का उघडली जात नाहीत, असा प्रश्नही यावेळी करण्यात आला. 

अधिक वाचाः  कोरोना नियंत्रणातच, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

मंदिरे उघडण्याचा प्रश्न हिंदूंच्या भावनांचा आहेच, पण तो प्रश्न फक्त तेवढ्यापुरताच मर्यादित नसून तो हजारो व्यक्तींच्या पोटापाण्याचाही प्रश्न आहे. या मंदिराभोवती असलेले पूजासाहित्य, प्रसाद, फुले आदींचे स्टॉल, हॉटेल, फुलविक्रेते शेतकरी, पूजा साहित्याचे निर्माते, मंदिरातील सेवक आदींची उपजिविका मंदिरावरच सुरु असते. सध्या मंदिरे बंद असल्याने त्यांच्या हालअपेष्टांमध्ये भरच पडली आहे, असेही यावेळी नेत्यांनी दाखवून दिले. 

देशाचे एकंदर अर्थचक्र सुरळीत व्हावे यासाठी अनलॉकिंगच्या विविध टप्प्यांमध्ये अनेक बाबी खुल्या करण्यात आल्या. त्याच न्यायाने मंदिरांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी भाजप नेत्यांनी सिद्धिविनायक मंदिरासमोर घेतलेल्या सभेत केली. यासंदर्भात केंद्र सरकारनेही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार राज्य सरकारने एसओपी तयार करून मंदिरे खुली करावीत, असेही आज सांगण्यात आले.

-----------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Outside Siddhivinayak temple BJP leaders protest activists police custody


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outside Siddhivinayak temple BJP leaders protest activists police custody