esakal | याला म्हणतात "ठाकरे ब्रँड", मनसेचा शिवसेनेला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

raj-uddhav

याला म्हणतात "ठाकरे ब्रँड", मनसेचा शिवसेनेला टोला

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्यात मागच्या आठवड्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक केंद्रांवर लसी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना माघारी पाठवण्यात आले होते. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला होता. दर आठवड्याला सहा लाखापर्यंत लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे. पण त्या वेगाने लसी सुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत. लसींच्या कमतरतेचा हा मुद्दा लक्षात घेऊन महाराष्ट्राला लस निर्मितीची परवानगी द्यावी, अशी सुद्धा मागणी करण्यात येत होती.

हेही वाचा: कोरोना, लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे ५०० कोटीचे नुकसान

आता केंद्र सरकारने परळ येथील प्रसिद्ध हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची परवानगी दिली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबईतील एक जुनी अनुभवी संशोधन संस्था असून त्यांच्याकडे लस निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रात हाफकिन सारख्या संस्थेला लस निर्मितीची परवागनी द्यावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर लगेचच पंतप्रधानांनी हाफकिनला लस निर्मितीची परवानगी देत असल्याचे जाहीर केले.

पण राज यांच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हाफकिन संस्थेला भेट देऊन लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. आता राज यांच्या पत्रानंतर लगेचच हाफकिनला लस निर्मितीची परवानगी मिळाल्याने शिवसेना-मनसेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावरुनच एक सूचक टि्वट केलं आहे. 'ठाकरे ब्रँड' कशाला म्हणतात हे सांगताना नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात श्रेयवादाची ही लढाई आणखी तीव्र होऊ शकते.

loading image
go to top