नांदवी शाळेला इमारतीची गरज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

माणगाव तालुक्‍यातील नांदवी येथील आदिवासी आश्रमशाळेला शासकीय इमारत नाही.

माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्‍यातील नांदवी येथील आदिवासी आश्रमशाळेला शासकीय इमारत नाही. शाळा मंजूर झाल्यापासून एका खासगी मालकीच्या इमारतीमध्ये भरवली जात आहे. गेली अनेक वर्षे महसूल विभागाकडे जागेबाबतचा मागणी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे. 

किमान पाच एकर जमीन या आदिवासी आश्रमशाळेसाठी लागत असून, शासकीय जागा मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी, माणगाव तहसील यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत माणगाव तालुक्‍यातील नांदवी आश्रमशाळेला २००६ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानुसार या ठिकाणी माणगाव, गोरेगाव, महाड या परिसरातील आदिवासी मुलांना शिक्षण आणि राहण्याची सुविधा असलेली निवासी शाळा सुरू करण्यात आली. इमारत उभी न करताच या ठिकाणी भाडेतत्त्वावर एक इमारत घेऊन ही शाळा २००६ पासून सुरू आहे. वीर, टोळ, संदेरी, श्रीवर्धन आणि महाडमधील जवळपास ९६ आदिवासी विद्यार्थी सध्या या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. यामध्ये ४४ मुली आणि ५२ मुलांचा समावेश आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असून, सध्या असलेल्या खासगी इमारतीमध्येच या मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. 

सर्व शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी राबवले जात असले, तरी क्रीडांगण, संगणक कक्ष आदी आधुनिक सुविधा अपूर्ण आहेत. ज्या इमारतीमध्ये सध्य ही निवासी शाळा सुरू आहे, त्या ठिकाणी क्रीडांगणाची कमतरता आहे. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेल आहे. असे असले तरी गेली १३ वर्षे या निवासी शाळेला शासकीय जागा मिळवून देण्यात महसूल कर्मचारी कानाडोळा करत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

जवळपास प्रतिमहिना ३१ हजार रुपये भाडे या खासगी इमारतीला मोजावे लागत आहेत. ज्या ठिकाणी ही निवासी शाळा आहे ते माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे गाव आहे. यामुळे या ठिकाणी गावात शासकीय उपक्रम आणि योजना त्या काळात राबवल्या गेल्या; मात्र या योजनांकडे त्यानंतरच्या काळात दुर्लक्ष झाले आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेणकडून जागा मिळावी म्हणून माणगाव तहसील कार्यालयात पाठपुरावा करण्यात आला आहे. हा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचला, तरी माणगावमध्ये जागा उपलब्ध झालेली नाही. 

कर्मचारी संख्याही अपुरीच
शाळा मंजुरीनंतर या ठिकाणी १८ पदे मंजूर करण्यात आली आहेत; मात्र यामध्ये देखील कर्मचारी संख्या अपूर्णच आहे. येथील मुख्याध्यापक हे पद देखील रिक्त आहे. प्राथमिक शिक्षक सहा मंजूर असली, तरी प्रत्यक्षात ४ शिक्षक पदे रिक्त आहेत. पुरुष अधीक्षक पद देखील रिक्त राहिले आहे. सध्या असलेले शिक्षकच ही शाळा सांभाळण्याचे काम करत आहेत. 

समाजकल्याण शाळेचीही मागणी
माणगाव तालुक्‍यातील जावळी येथे समाजकल्याण विभागाची आश्रमशाळा आहे. मध्यंतरी या ठिकाणी पटसंख्या घसरली होती. यामुळे या इमारतीमध्ये ही निवासी शाळा भरण्यास परवानगी मिळावी म्हणून मागणी केली होती. या मागणीला समाजकल्याण विभागाने नकार देत या ठिकाणी पुन्हा शाळा सुरू केल्याचे प्रभारी मुख्याध्यापिका व्ही. बी. कानवटे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Own Building need to Nandavi School