धक्कादायक! कोरोनाने घेतला २ लाख कोंबड्यांचा जीव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

डहाणूतील प्रकार

कासा - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना रोगाच्या समाजमाध्यमावर पसरत असणाऱ्या काही अफवांमुळे डहाणूतील पोल्ट्री व्यावसायिकाला करोडोंचे नुकसान झाले आहे. कोंबड्यामुळे कोरोना होतो अशा प्रकारच्या समाजमाध्यमावरील अफवांमुळे राज्यभरात कोंबड्यांची मागणी कमालीची घटली आहे. याचमुळे डहाणू तालुक्‍यातील गंजाड या गावातील पोल्ट्री व्यावसायिक संदीप भाटलेकर यांनी आपल्या पोल्ट्री व हॅचरीमधील नऊ लाख अंडी व पावणेदोन लाख कोंबड्यांची पिल्ले जमिनीत पुरून टाकली आहेत. 

हेही वाचा - कोरोना प्रतिबंधासाठी HIV लस ठरतेय गुणकारी?

कोरोना विषाणूच्या भीतीने कोंबडीचे मांस खाणे नागरिकांनी सोडले आहे. त्यामुळे पोल्ट्रीमध्ये कोंबड्या तशाच पडून आहेत. त्यांच्या पालणपोषणासाठी पोल्ट्रीमालकांना खर्च करावा लागत आहे. एका लहान कोंबडीच्या पिाचे साधारण 40 दिवसात मोठी 2 किलोच्या कोंबडीत रूपांतर होते. त्यासाठी 75 ते 80 रुपये इतका खर्च येतो; तर दुसरीकडे कोंबडीच्या मांसाला मात्र 10 ते 15 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे या नुकसानापासून वाचण्यासाठी अंडी व कोंबड्यांच्या पिांना जमिनीत पुरावे लागत असल्याचे मत वर्तविण्यात येत आहे. 

पोल्ट्रीमालक संदीप भाटलेकर यांचे पालघर जिल्ह्यात 2 हॅचरी व 35 पोल्ट्री उद्योग आहेत. सध्या 90 हजारांहून अधिक कोंबड्या विकण्यासाठी त्यांच्याकडे आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीने कोणी त्या विकत घेत नसल्याने त्या तशाच पडून आहेत. तसेच कोंबडीचे मांस शीतगृहात ठेवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला; मात्र ब्लास्ट फ्रीजर व कुलरचा खर्च परवडत नसल्याने पुढे काय करावे, या विवंचनेत पोल्ट्री व्यावसायिक सापडले आहेत. तसेच पोल्ट्री व हॅचरी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कामगार लागतात. कोंबड्याची औषधे, खाणे या सगळ्यासाठी पैसे कुठून आणणार? हा प्रश्नदेखील पोल्ट्री व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे.

हेही वाचा -  मुंबईच्या रस्त्यांवर सुरु आहे हा काळाबाजार 

संदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पोल्ट्री व्यवसायात 120 ते 130 कामगार आहेत. मराठवाड्यातील हे कामगार जवळपास 30 ते 35 वर्षांपासून त्यांच्याकडे काम करीत आहेत. मात्र यंदा कोरोनाच्या भीतीमुळे हा व्यवसाय धोक्‍यात आल्याने अनेक कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांनी पालघर जिल्हा पोल्ट्री व्यवसाय असोसिएशनतर्फे पालघर जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र देऊन प्रशासनाला मदतीची मागणी केली आहे. त्यात त्यांनी कर्जमाफीची अपेक्षा प्रशासनासमोर व्यक्त केली आहे. 

कोरोना हा रोग कोंबड्या किंवा कोणत्याही पक्ष्यांपासून होत नाही. हा केवळ माणसांकडून माणसाला होऊ शकतो. कोंबडीचे मांस खाल्ल्याने हा रोग होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्‍वास न ठेवता सावधानता बाळगा आणि मोबाईलवर आलेले अफवांचे मेसेज पुढे पाठवू नका. त्याउलट जास्त गर्दीच्या जागी जाणे टाळा. - 
- डॉ. राहुल संखे, पशुवैद्यकीय अधिकारी, डहाणू. 

web title : The owner of the poultry buried 3 lakh eggs and 3 lakh chickens in the soil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The owner of the poultry buried 3 lakh eggs and 3 lakh chickens in the soil