esakal | ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Oxygen

रूग्णसंख्या वाढत असताना वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा ही राज्यातील गंभीर बाब

ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: ऑक्सिजन उत्पादकांवर नियंत्रण ठेऊन ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. ऑक्सिजन उत्पादकांना आता विवरण पत्रानुसार ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने या बाबतचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात उत्पादित होणारा आणि इतर राज्यातून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील जिल्ह्यांना सुरळीत व आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा, यासाठी पुरवठ्याबाबतचे विवरणपत्र तयार करून देण्यात येणार आहे. त्यानुसारच उत्पादकांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे.

नव्या नियमामुसार, शुक्रवारी ऑक्सिजन उत्पादकांनी 1 हजार 608 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केला. शनिवारी उत्पादकांनी 1 हजार 674 टन ऑक्सिजन वितरीत केला. तर रविवारी 1 हजार 695 टन ऑक्सिजन पुरवला. अन्न व औषध प्रशासनाद्वारे व शासनाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारागृहांमध्ये कोविड केअर सेंटर

केंद्राकडून 8,09,000 रेमडेसीविरचा कोटा मंजूर

21 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान एकूण 3 लाख 44 हजार 494 इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना वितरित झाला आहे. तर 1 मे रोजी अंदाजे 72 हजार नग इतका साठा वितरीत करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यासाठी  21 एप्रिल ते 09 मे या कालावधीसाठी एकूण 8 लाख 09 हजार एवढा कोटा मंजूर केलेला आहे. येत्या काही दिवसात राज्यासाठी अधिक रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील, असे अन्न व औषध प्रशासनाने कळवले आहे. राज्यासाठी सात उत्पादक मिळून एकूण 4 लाख 73 हजार 500 रेमडेसिवीरचा साठा 21 एप्रिल ते 2 मे या कालावधीत वितरित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. उत्पादकांच्या भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा करण्यात येतो.

सात कंपन्यांकडून रेमडेसिविरचे उत्पादन

रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते.

(संपादन- विराज भागवत)