'या' कारणामुळे अरबी समुद्रात P305 बुडालं जहाजं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'या' कारणामुळे अरबी समुद्रात बुडालं P305 जहाजं

'या' कारणामुळे अरबी समुद्रात बुडालं P305 जहाजं

मुंबई: वादळात आमचे सर्व बार्ज व रीग सुरक्षित जागी नेण्याचे प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केले. मात्र चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पी 305 बार्जचे (P 305 barje) सर्व नांगर तुटून तो भरकटला आणि एका निर्मनुष्य तेलउत्खनन फलाटावर (oil platform) आदळला. त्यामुळे त्याच्यात पाणी भरून नंतर तो बुडाला, अशी माहिती ओएनजीसी (ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) तर्फे आज देण्यात आली आहे. (P 305 barje collide with oil platform thats why it sank in arbian sea)

दुर्घटनाग्रस्त कर्मचाऱ्यांना ओएनजीसी तर्फे तत्काळ आर्थिक साह्य देखील जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक मृताच्या नातलगांना दोन लाख रुपये तर बचावलेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातील. त्याखेरीज ओएनजीसीचा भागीदार असलेला अॅफकॉन कन्स्ट्रक्शन देखील मृतांच्या नातलगांना व बचावलेल्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई देणार असून ती मदत लवकरच जाहीर केली जाईल, असेही ओएनजीसी ने म्हटले आहे.

हेही वाचा: मुंबई अनलॉक बाबत BMC अतिरिक्त आयुक्तांचं महत्त्वाचं विधान

ओएनजीसी च्या प्रकल्पांवर काम करणाऱ्या अॅफकॉनचे तीन बार्ज तसेच समुद्रात खोदकाम करणारा ओएनजीसीचा एक रीग (फलाट) यांची देखील सोमवारी आलेल्या चक्रीवादळात हानी झाली. पी 305 बार्ज हा भरकटून ओएनजीसीच्या तेलउत्खनन फलाटावर धडकल्याने सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बुडू लागला. नौदल, तटरक्षक दल आदींच्या साह्याने ओएनजीसीच्या साह्य नौकैने घटनास्थळी तत्काळ मदतकार्य सुरु केले. अजूनही शोधकार्य सुरू असून याकामी मदत करणाऱ्या सर्वांचे ओएनजीसीने आभार मानले आहेत.

हेही वाचा: मुंबई: विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या API ची पगारवाढ रोखली

वादळात हालचाली करणे कठीण असूनही कर्मचाऱ्यांनी बार्ज व रीग सुरक्षित जागी नेण्याचे प्रयत्न केले, असेही ओएनजीसी ने म्हटले आहे. अजूनही भरसमुद्रात शोधकार्य सुरु असून यात अॅफकॉन देखील आमच्याबरोबर आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करून ओएनजीसी ने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याबरोबरच त्यांची सर्व व्यवस्था करण्यात येईल व त्याचा खर्च देण्यात येईल, असेही ओएनजीसी ने जाहीर केले आहे.

loading image
go to top