काय सांगता? भिवंडीतील पहारे गावात 25 वर्षांपासून सरपंचच नाही; कारण वाचून व्हाल थक्क!

काय सांगता? भिवंडीतील पहारे गावात 25 वर्षांपासून सरपंचच नाही; कारण वाचून व्हाल थक्क!

वज्रेश्वरी : ग्रामीण विकासाचा आधार असलेल्या 'सरपंचा'शिवाय गाव अशी कल्पनाच करणे अशक्य. बिनविरोध निवडणूक येऊद्या किंवा निवडणुकांमधून, सरपंचाशिवाय गावचा गाडा हाकणे शक्य नाही. देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यात मात्र एका ग्रामपंचायतीला गेल्या 25 वर्षांपासून सरपंचच लाभला नाही. त्याला कारणही तसेच आहे. 

सरकारकडून ग्रामीण भागाच्या विकासाचा दिंडोरा पिटला जात असला, तरी आजही बहुतांश भागात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांना झगडावे लागत आहे. भिवंडी तालुक्‍यात पहारे गावातही हीच स्थिती असली तरी येथील कारण मात्र आश्‍चर्यकारक आहे. कारण गेल्या 25 वर्षांपासून पहारे गावाला सरपंचच नसल्याने येथे "विकासाचे वारे'च पोहोचले नाहीत. 

सुमारे 2200 लोकसंख्या असलेल्या या पहारे गावात बहुतांश आगरी समाज वास्तव्यास आहे. 1995 ला या गावात सरपंचपदावर आदिवासी आरक्षण पडले; मात्र गावात एकही आदिवासी घर किंवा व्यक्ती नसल्याने तेव्हापासून ग्रामपंचायतीच्या सरपंचाची खुर्ची रिकामीच आहे.

परिणामी रस्ते, पाणी, वीज, शाळा या मूलभूत सुविधांची गावात वानवा आहे. गावातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे; तर पिण्याच्या पाण्याची टाकी असली, तरी त्यात पाणीच नाही. परिणामी ग्रामस्थांना बोअरवेलचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. 

गावात एकमेव असलेली जिल्हा परिषदेची शाळा 10 वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे. शाळेत विद्यार्थी शिकत असले, तरी ते जीव मुठीत घेऊनच शिक्षणाचे धडे घेत आहेत. गावातील विजेचे वाकलेले खांब, तुटलेल्या वीजवाहिन्या, पथदिव्यांचा अभाव, गटारांची सुविधा नसल्याने या गावात "विकास' पोहोचणार कधी, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत. त्यासाठी या गावचे सरपंचाचे आदिवासी आरक्षण प्रथम हटवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

पहारे गावाला सरपंचच नसल्याने ग्रामसेवक काम पाहतात; मात्र त्यांच्याकडे दोन गावांची कामे असल्याने ते 15 दिवसांनी किंवा महिन्याने येतात. त्यामुळे कामे होत नाहीत. गावची सर्वच कामे पूर्णपणे ठप्प असल्याने गावची प्रगती होत नाही. त्यासाठी सरकारने आदिवासी आरक्षण हटवणे गरजेचे आहे. 
- भरत भोईर, पोलिस पाटील, पहारे 

आमच्या गावात रस्ते, वीज, पाणी, गटारे आदी सुविधांची वानवा आहे. गावात आदिवासी लोकवस्ती नसताना आरक्षण लादून आमच्यावर प्रशासनाने घोर अन्याय केला आहे. त्यामुळे सरकारने आरक्षण हटवून आमच्या गावाला न्याय द्यावा. 
- पुंडलिक पाटील, 
माजी सरपंच, पहारे 

----------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com