पालघर : जावेद लुलानिया गोळीबार प्रकरणात दोन संशयित आरोपींना कोठडी | Palghar crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

पालघर : जावेद लुलानिया गोळीबार प्रकरणात दोन संशयित आरोपींना कोठडी

पालघर : माजी नगरसेवक व पत्रकार जावेद लुलानिया (javed lulania) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणांमध्ये (firing case) पालघर पोलिसांनी (palghar police) न्यायालयासमोर हजर केलेल्या दोन संशयितांना तीन (three suspects) दिवसांची पोलिस कोठडी (police custody) सुनावण्यात आली. न्यायदंडाधिकारी विक्रांत खंदारे (vikrant khandare) यांनी ही पोलिस कोठडी दोन्ही पक्षाचे वकील यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला.

हेही वाचा: परिवहन मंत्री परब यांची एसटी मुख्यालयातील बैठक निष्फळ

जावेद लुलानिया यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेले दोन संशयित हे पालघरमधील व्यावसायिक आहेत. गोळीबाराची घटना झाल्यानंतर जावेद यांनी दिलेल्या जबानीमध्ये हा जीवघेणा हल्ला या दोघांनीच केल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही संशयित भावंडांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली. शनिवारी दोघा संशयितांना पालघरच्या न्यायालयात हजर केले.

न्यायालयामध्ये सरकारी वकील व संशयित आरोपी पक्षाचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, अशी दाट शक्यता सरकारी वकिलांमार्फत वर्तविण्यात आली व त्यांनी पोलिस कोठडीची मागणी केली; तर या गोष्टीचे खंडन संशयित आरोपींच्या वकिलांनी केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी विक्रांत खंदारे यांनी संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

प्रकृती स्थिर

जावेद लुलानिया यांच्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांपैकी एकाने गोळीबार केला. या गोळीबारामध्ये जावेद लुलानिया जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांच्या नातेवाइकांना सांगितले आहे.

loading image
go to top