पालघर लोकसभा पोटनिवडणूक; न होणारी पोटनिवडणूक बनली चुरशीची

भगवान खैरनार
मंगळवार, 15 मे 2018

मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे.

मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे.

ही निवडणूक जाहीर होताच, फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आयाराम उमेदवारांना रिंगणात उतरविले आणि तेथेच दोन्ही सत्ताधारी मात्र, कट्टर विरोधी पक्षांत निवडणुकीची ठिणगी पडली. त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि पालघर चे पालकमंत्री विष्णु सवरा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर, रिक्त झालेली पलुस - कुडेगाव विधानसभा पोटनिवडणूक सर्व पक्ष्यांनी सहानुभूती दाखवत विश्वजित कदम यांना बिनविरोध बहाल केली. हीच स्थिती पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी होईल हीच अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, तसे न होता शिवसेना - भाजप या सत्ताधारी पक्षांनी ती परस्पर विरोधी प्रतिष्ठेची केली आहे.

भाजप मधील अंतर्गत वादामुळे चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा हे सेनेच्या तंबूत दाखल झाले, तर काॅग्रेस चे माजी राज्य मंत्री राजेंद्र गावीत यांचे राजकीय स्थान काॅग्रेस मध्ये अस्थिर होत चालल्याने त्यांनी भाजप चा आसरा घेतला. स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडल्यानंतर, त्यांना लोकसभा पोटनिवडणूकीचे ऊमेदवार घोषित करण्यात आले. या सर्व घटनांची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ही पोटनिवडणूक अवघ्या नऊ महिन्यांसाठी प्रतिष्ठेची केली. त्यासाठी शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप चे पालघर चे पापालकमंत्री विष्णु सवरा यांच्या वर दोन्ही पक्षांनी जबाबदारी देऊन त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

वास्तविक भाजप, शिवसेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडीने सर्वानुमते एकत्र येऊन, ही पोटनिवडणूक बिनविरोध करणे अपेक्षित होते, आणि तीच खरी स्वर्गीय खासदार चिंतामण वनगा यांना श्रध्दांजली ठरली असती. ज्या वनगांनी गेली 37 वर्ष राजकारणात राहून आदिवासी भागाची निस्वार्थ सेवा केली, त्याच वनगांच्या मृत्यू पश्चात त्यांचे राजकीय भांडवल करून, पोटनिवडणूक लढविली जात आहे हे निंदनीय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ही पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय अनेक राजकीय पक्षांनी घेतला होता. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्या बद्दल स्पष्ट भुमिका मांडली होती. काॅग्रेस मधील एक गट ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. मात्र, सत्तेत सहभागी असुनही सतत ऐकमेकांना कोंडीत पकडणाऱ्या भाजप - शिवसेनेने फोडाफोडीचे राजकारण करून ही पोटनिवडणूक जनतेवर आणि शासकीय व्यवस्थेवर लादल्याची टिका जनतेतून होत आहे. 

केवळ नऊ महिण्याच्या कालावधीत नवीन खासदार निवडून येऊन कीती विकास कामे करणार आहे. असा सवाल विचारला जात आहे. मात्र, या पोटनिवडणूकीच्या माध्यमातून पालघर जिल्हयात कोणत्या पक्षाची ताकद कीती प्रमाणात आहे हे विधानसभा निहाय सिद्ध होणार आहे. आगामी विधानसभा  व लोकसभा निवडणूका शिवसेना, भाजप स्वबळावर लढविणार असल्याने आणि पालघर पोटनिवडणूक ची लढत ही या दोन पक्षामध्ये च असल्याने, आगामी निवडणुकीची रंगीत तालीम ही पोटनिवडणूक ठरणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दव ठाकरे हे रणांगणात ऊतरले आहेत. तर दोन्ही पक्षांचे दोन जिल्ह्याचे पालकमंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Web Title: palghar loksabha by poll by this poll important for politics