पालघर: शाळेतील स्वागताने चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवरचा रुसवा गायब

प्रवीण चव्हाण
गुरुवार, 15 जून 2017

तलासरी (जि. पालघर) - आई बाबांचा हात धरून, चिमुकली पाय लटूपुटू चालत इवल्याशा डोळ्यातुन अश्रू वाहत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रवेशोत्सवाच्या स्वागताने हसू उमलले आणि रुसवा गायब होऊन वर्गात चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागल्याचे चित्र आज येथील शाळेत दिसून आले.

तलासरी (जि. पालघर) - आई बाबांचा हात धरून, चिमुकली पाय लटूपुटू चालत इवल्याशा डोळ्यातुन अश्रू वाहत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रवेशोत्सवाच्या स्वागताने हसू उमलले आणि रुसवा गायब होऊन वर्गात चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागल्याचे चित्र आज येथील शाळेत दिसून आले.

शाळेचा पहिला दिवस म्हटला की शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांसाठी आणि मनसोक्त सुट्टीची आंनद लुटणाऱ्या बालकांसाठी रुसवा फुगव्याचा आणि रडगाण्याचा दिवस. त्यात आई बाबांचा धाक असतोच. मात्र यातून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, याकरिता यंदाही दरवर्षीप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या पाहिल्या दिवसाच्या प्रवेशोत्सवासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील व अन्य विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाने तालुक्‍यातील विविध जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळेमध्ये हजेरी लावत कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आल्याने शाळेचा परिसर स्वच्छ करून शाळेबाहेर रंगीबेरंगी पताका, रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती. तर वरखंडा शांतिकुमार विद्यामंदिर, झरी ज्ञानंमाता विद्यामंदिर, शेतकी शाळा तलासरी तसेच जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशोत्सव प्रभात फेरी काढत शिक्षणाविषयी जनजागृती करून आनंद साजरा केला. तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले याच वेळी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या हस्ते पाठयक्रमाचे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

तालुक्‍यात 214 शाळा आजपासून (गुरुवार) सुरु झाल्या आहेत. तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 154 शाळा आणि अन्य 60 अश्‍या एकूण 214 शाळा असून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत 47,883 विद्यर्थी शाळेत शिक्षण घेणार आहेत. जिल्हा परिषद शाळेत मागील शैक्षणिक वर्षापासून इयता आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. त्याठिकाणी इयत्ता नववीचे वर्ग सुरु न केल्याने दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना वणवण फिरावे लागत आहे. तसेच प्रवेश मिळविण्याकरिता शिक्षण विभागाचेही उंबरठे झिजवावे लागत आहे. परंतु शिक्षण विभागातही फक्त आश्वासन दिले जात असून ठोस निर्णय घेतले जात नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने हा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची विनंती करण्यात येत आहे.

 

Web Title: palghar news marathi news school start students reaction maharashtra news