esakal | 'जिद्द असावी तर अशी; व्यंगत्वावर मात करणाऱ्या शिक्षिकेची प्रेरणादायी कहाणी'
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher pratibha hilim

'जिद्द असावी तर अशी; व्यंगत्वावर मात करणाऱ्या शिक्षिकेची प्रेरणादायी कहाणी'

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड : आज सर्वत्र शिक्षक दिन (Teachers day) साजरा केला जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका (Teachers role) अत्यंत महत्वाची आणि विशेष असते. मुलाला यशस्वी आणि उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजावतो. मात्र अपंगत्वावर (handicapped) मात करत कोरोना (corona) काळात आदिवासी भागात (tribal area) शिक्षकिचे ज्ञानदानाचे धडे (knowledge lessons) देणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे येथील प्रतिभा हिलीम (Pratibha Hilim) या शिक्षेकेची प्रेरणादायी कहाणी..

हेही वाचा: दहिसरमध्ये आगळेवेगळे एनर्जीपार्क; अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे उभारणी

असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. अशीच एक प्रेरणादायी कहाणी विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे येथील शरीराने अपंग असलेल्या कर्तृत्ववान शिक्षिका प्रतिभा हिलीम या शिक्षिकेची आहे. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणसं या जगात आहेत. मात्र आपल्या आयुष्यात शारीरिक कमतरता असतानाही आनंदी जीवन जगणारी माणसेही आहेत. एका जिद्दी, हुशार, कष्टाळू व समर्पण भावनेने ज्ञान दानाचे कार्य करणा-या एका शिक्षिकेची ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

प्रतिभा हिलीम या शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समिती अंतर्गत राहनाळ येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना 2019 साली तापासारख्या आजाराने त्या आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की आजारात त्यांना आपले दोन्ही हात पाय अर्ध्यातून गमवावे लागले, मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत. 27 वर्ष शिक्षकी पेशा असलेल्या हिलीम यांना स्वस्त बसून देत नव्हता. त्यांचे मूळ गाव विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे असल्यामुळे आपण गावाच्या ॠणात आहोत याची जाणीव ठेवून त्या आपल्या गावी आल्या.

त्यानंतर दीड वर्षांपूर्वी कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद झाल्या. शाळा सुरु करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हेही सांगता येणे कठीण झाले होते. शाळा सुरु झाल्याच तरी, सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण झाले. सरकारने शाळा ऑनलाईन सुरु करायला परवानगी दिली. अनेक शाळांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे, ऑनलाईन उपक्रम सुरु देखील केले. परंतू ग्रामीण भागात नेटवर्क नसणे,पालकांकडे एंड्राइड मोबाइल नसणे यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत ही बाब त्यांच्या लक्षात आली.

हेही वाचा: कल्याणमध्ये डॉक्टरांच्या संघटनेकडून पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव

या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून येथील विद्यार्थ्याना एकत्र करून त्यांनी ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात केली. आपल्या अपंगावर यशस्वीपणे मात करत जे विद्यार्थी आज ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्याना शिकविण्याचे कार्य त्या करीत आहेत. इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या साधारणपणे 25 विद्यार्थ्याना त्या शिकविण्याचे कामाला सुरवात केली. आता त्याच्याकडे 30-35 विध्यार्थी ज्ञानदानाचे धडे घेत आहेत. आपल्या हाताच्या बेल्टला पेनाचे टोपण लावून त्यात खडू वापरून त्या विद्यार्थ्याना शिकवितात. शिक्षक दिनानिमित्त अपंगत्वावर मात करत कोरोना काळात आदिवासी भागात शिक्षकिचे हे ज्ञानदानाचे कार्य खरोखरच सर्वाना प्रेरणा देणारे आहे.

"कोरोना महामारीच्या काळात सरकारने शाळा ऑनलाईन सुरु करायला परवानगी दिली. परंतू ग्रामीण भागात नेटवर्क नसणे,पालकांकडे एंड्राइड मोबाइल नसणे यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत ही बाब माझ्या लक्षात आली आणि मग या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरु करण्यात आले."

-प्रतिभा हिलीम (प्राथमिक शिक्षिका)

"आमच्याकडे नेटवर्क कमी आहे,काही विद्यार्थ्यांकडे एंड्राइड मोबाइल नाही. त्यामुळे आमच्या भागातील विध्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास अडचणी येत होत्या. परंतू आमच्या भागातील शिक्षिका प्रतिभा हीलीम या अपंग असतांना ही कोरोना काळात ही आमच्या मुलांना ज्ञानदानाचे काम केले आहे."

-देवराम हिलीम

(विध्यार्थीनीचे पालक)

loading image
go to top