खारघरमधील पांडवकड्यावर पर्यटकांची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

नवी मुंबई - निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या व डोंगराच्या कुशीत वसलेला खारघरमधील पांडवकडा धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवार व शनिवारी दोन दिवस पावसाने जोर धरल्यामुळे रविवारी सकाळपासून पांडवकडा वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रविवारची सुटी साधून अनेक पर्यटकांनी तेथे हजेरी लावली.

खारघरच्या एका बाजूला असलेला पांडवकडा धबधबा कोसळताना रस्त्यावरून अगदी सहजपणे दिसत असल्यामुळे त्याची माहिती सर्व पर्यटकांना सहज मिळते. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच तेथे पर्यटक येण्यास सुरुवात झाली. नवी मुंबई, तळोजा, पनवेल, नवीन पनवेल, चेंबूर, मानखुर्द, कल्याण-डोंबिवली येथील पर्यटकांनी त्याचा मनसोक्त आनंद लुटला. पावसाची सुरुवात असल्यामुळे धबधब्यावर नेहमीपेक्षा कमी पाण्याचा ओघ होता. त्यामुळे पर्यटकांनाही त्याच्या धारेखाली अंघोळीची मजा लुटता आली. पर्यटकांची संख्याही कमी असल्यामुळे मनसोक्त भिजण्याचा आनंद सर्वांना मिळाला. खारघर रेल्वेस्थानकापासून तळोजाकडे जाण्याऱ्या रस्त्यावर मध्येच पांडवकडा असल्यामुळे या ठिकाणी खासगी वाहनांबरोबरच रिक्षांचाही पर्याय आहे. पांडवकडा परिसरात खड्ड्यांमध्येही पाणी साचल्यामुळे बच्चेकंपनीने डुंबण्याचा आनंद लुटला. पहिल्याच दिवशी तेथे पोलिस नसल्यामुळे पर्यटकांचेही फावले.

पांडवकडा धबधब्यावर दर वर्षी पर्यटक वाहून जाण्याचे, बुडण्याचे, मृत्युमुखी पडण्याचे व जखमी होण्याच्या घटना घडतात. काही जण तेथे दारूच्या पार्ट्या करतात. त्यातून हाणामाऱ्यांचे प्रकार घडतात. त्यामुळे या भागात दर वर्षी नवी मुंबई पोलिसांकडून जमावबंदी करण्यात येते. त्यानुसार खारघर पोलिसांनी जमावबंदीसाठी पोलिस आयुक्तांकडे परवानगीची प्रक्रिया सुरू केली आहे.
- प्रदीप तिदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर

Web Title: Pandavkada waterfall Kharghar rain tourist